केंद्राच्या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करत ‘या’ राज्याने केली नाईट कर्फ्यूची घोषणा

 भोपाळ – ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्यांची संख्या वाढत असल्यानं कोरोना नियमांचं काटेकोर पालन केलं जावं, असा सल्ला केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना दिला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी काल राज्यांचे आरोग्य सचिव आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या व्यवस्थापकीय संचालकांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधत आढावा घेतला.

संसर्गवाढ रोखणे, चाचण्या, रुग्णालयातील व्यवस्थापन, कोरोना सुरक्षित व्यवहार आणि लसीकरण या पाच मुद्द्यांवर राजेश भूषण यांनी यावेळी भर दिला. नाताळच्या पार्श्वभूमीवर रात्रीची संचारबंदी आणि गर्दी होणाऱ्या समारंभांवर निर्बंध लावण्याचा सल्लाही राज्यांना देण्यात आला आहे. तसंच, एकाच ठिकाणी अधिक रुग्ण आढळल्यास प्रतिबंधित क्षेत्रही तातडीनं जाहीर करावं, असं सुचवण्यात आलं आहे.

दरम्यान, कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश सरकारनं आजपासून रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत हे निर्बंध लागू असणार आहेत. काल संध्याकाळी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी जनतेशी संवाद साधताना ही माहिती दिली. तत्पुर्वी चौहान यांनी राज्यातील कोरोना संसर्ग आणि लसीकरणाबाबत मंत्रालयांत आढावा बैठक घेतली.

दुसरीकडे काल आपल्या राज्यात काल कोरोनाच्या 1 हजार 179 नवबाधितांची नोंद झाली; तर 23 ओमीक्रॉन बाधित आढळून आले. राज्यातल्या एकंदर ओमीक्रॉन बाधितांची संख्या 88 झाली आहे. यापैकी ४२ जणांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. राज्यातली कोरोना परिस्थिती लक्षात घेता यंदा देखील नाताळचा सण संपूर्ण खबरदारी घेऊन साध्या पध्दतीने साजरा करण्यासंदर्भात राज्य शासनाच्या गृह विभागानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

नाताळ आणि नववर्ष स्वागत समारंभांना होणाऱ्या गर्दीवर निर्बंध लावण्याबाबत आज नवी नियमावली जाहीर केली जाण्याचीही शक्यता आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल कोरोना विषयक कृती दलाच्या सदस्यांशी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून चर्चा केली.