शिवप्रेमी रजनीकांत! घराच्या भिंतीवर लावलाय शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती फोटो, होतंय कौतुक

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची ख्याती केवळ महाराष्ट्र नव्हे जगभरात आहे. शिवभक्त वेगवेगळ्या प्रकारे शिवाजी महाराजांप्रती त्यांचे प्रेम व्यक्त करताना दिसतात. जेष्ठ अभिनेते रजनीकांत हेदेखील शिवाजी महाराजांचे मोठे भक्त असल्याचे एका पोस्टवरुन दिसून आले आहे. रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या हिने ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ज्यानंतर रजनीकांत चर्चेत आले आहेत.

रजनीकांत (RajiniKanth) या नावाची वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही. रजनीकांत यांचं मूळ महाराष्ट्रातील (Maharashtra) असलं तरी त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवली आहे. प्रामुख्याने तामिळ चित्रपटांमध्ये सुपरस्टार ही नवी ओळख निर्माण करणारे रजनीकांत कन्नड, तेलगू, हिंदीसहीत इंग्रजी चित्रपटांमध्येही झळकले आहेत. सध्या ते चर्चेत आहेत त्यांच्या मुलीने (RajiniKanth Daughter)शेअर केलेल्या एका फोटोमुळे. रजनीकांत यांच्या घरातील या फोटोने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

नुकताच रजनीकांत यांनी त्यांच्या कुटुंबियांबरोबर पोंगल (Pongal)हा सण साजरा केला. यावेळी सर्वच कुटुंबीय एकत्र होते. रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्याने (Aishwarya Rajinikanth) सोशल मीडियावर या सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट केले आहेत. तिने शेअर केलेल्या ४ फोटोंपैकी शेवटच्या फोटोने युझर्सचे लक्ष वेधून घेतलं आहे.

हा फोटो रजनीकांत यांच्या घरातील असून त्यामध्ये ऐश्वर्या आई-वडिलांच्या म्हणजेच रजनीकांत आणि लता यांच्या पाया पडताना दिसत आहे. या फोटोमध्ये रजनीकांत ज्या भिंतीसमोर उभे आहेत त्या भिंतीवर महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती फोटो दिसून येत आहे. एका पिलरवर हा फोटो दिसत असून छत्रपती शिवाजी महाराज गडावरुन उतरतानाचं दृष्य या फोटोत दिसत आहे.

रजनीकांत यांची नाळ महाराष्ट्राशी जोडलेली असून आजही ते आपलं मूळ विसरलेले नाहीत हे या फोटोवरुन स्पष्ट होत आहे. रजनीकांत यांची मातृभाषा मराठी असून त्यांनी अनेकदा आपल्या महाराष्ट्र कनेक्शनबद्दल उघडपणे भाष्य केलं आहे. त्यांच्या घरातील हा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो त्यांना महाराजांबद्दल वाटणारा आदर आणि प्रेम दाखवणारच आहे.