५१ वर्षीय मनोज तिवारी तिसऱ्यांदा बनणार आहेत बापमाणूस, थाटात केलं पत्नीचं डोहाळे जेवण

भोजपुरी सुपरस्टार आणि भाजपा नेते मनोज तिवारी (Manoj Tiwari) यांच्या घरी पुन्हा एकदा पाळणा हालणार आहे. ५१ वर्षीय मनोज तिवारी तिसऱ्यांदा बापमाणूस बनणार आहेत. त्यांची दुसरी पत्नी सुरभी तिवारी (Surabhi Tiwari) या गरोदर असून नुकताच मोठ्या थाटामाटात त्यांचा डोहाळे जेवण सोहळा पार पडला आहे. सुरभी यांचे नातेवाईक या सोहळ्याला उपस्थित होते. मनोज तिवारी यांनी सोशल मीडियावर डोहाळे जेवणाचा (Baby Shower) व्हिडिओ पोस्ट केला आहे.

मनोज तिवारी यांनी इंस्टाग्रामद्वारे चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. त्यांनी त्यांच्या पत्नी सुरभी तिवारी यांच्या डोहाळे जेवणाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये आपला आनंद व्यक्त करत त्यांनी लिहिले आहे की, आनंदाच्या काही क्षणांना आपण शब्दांत मांडू शकत नसतो, आपण फक्त त्या क्षणांना अनुभवू शकतो..

लवकरच वडील बनणाऱ्या मनोज तिवारी यांनी सेलिब्रिटी शुभेच्छा देत आहेत. अक्षरा सिंग, गायक विशाल मिश्रा यांनी मनोज तिवारी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान मनोज तिवारी यांचे पहिले लग्न राणी तिवारी यांच्याशी झाले होते. परंतु त्यांचे हे लग्न जास्त वर्षे टिकू शकले नाही. त्यांना पहिल्या पत्नीपासून रीति तिवारी नावाची मुलगी आहे. त्यानंतर मनोज तिवारी यांनी २०२० मध्ये सुरभी तिवारी यांच्याशी दुसरे लग्न केले. त्यांना सान्विका नावाची मुलगी आहे. आता मनोज तिवारी तिसऱ्यांदा वडील बनणार आहेत.