तिला बोलायला ठेवलंय, भुंकायला नाही; मनसे नेत्याची सुषमा अंधारेंवर पातळी सोडून टीका

मुंबई: काल मुलुंड येथे झालेल्या सभेत शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. ऊठ दुपारी अन् घे सुपारी असे म्हणत सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांची खिल्ली उडवली. यावर प्रत्युत्तर देताना मनसेचे नेते प्रकाश महाजन यांची जीभ घसरली. त्यांनी सुषमा अंधारेंचा (Sushma Andhare) एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली आहे.

सुषमा अंधारेंची सभा कालच झाली. या बाईला काय बोलावं? मी बीड जिल्ह्यातील आहे. तीही बीड जिल्ह्यातील आहे. तिला बोलायला ठेवलंय, भुंकायला नाही. मेंदूला नारू झाला की काय तिच्या. काय बोलली ती? असा सवाल प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी केला.

कालच तिची सभा झाली. इतके वर्ष महापालिकेत सत्ता असून मातोश्रीचा मजला चढला नाही. पण कृष्णकुंजचा मजला चढला, असं ती म्हणाली. हे बोलण्याआधी तिने आपल्या मालकाला विचारायला हवं ना. मी असं बोलू की नको हे विचारलं पाहिजे ना? असा सवालही त्यांनी केला.

सुषमा अंधारेंमुळे उद्धव ठाकरेंना लवकरच महिलांच्या बंडाला सामोरं जावं लागणार आहे, अशी टीका करतानाच काल परवा मुसलमान झाल्यासारखं सुषमा अंधारे आदाब आदाब करत फिरतायत, असा हल्लाही त्यांनी चढवला. मातोश्री-2 कशी झाली ते सांगावं? उद्धव ठाकरेंना सवाल करावा, असंही ते म्हणाले.