अवघा देश प्रार्थना करत असताना प्रकाश राज यांनी उडवली चांद्रयान मोहिमेची खिल्ली, होतेय प्रचंड टीका

अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांनी भारताच्या चंद्र मोहिमेतील चांद्रयान-3 वरील (Chandrayaan 3) नुकत्याच केलेल्या पोस्टमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. 58 वर्षीय अभिनेत्याने चांद्रयान-3 मोहिमेवर ट्वीटर पोस्ट शेअर केली आहे, जी व्यंग्यात्मक आणि अपमानास्पद म्हणून पाहिले जात आहे.

नेटकऱ्यांनी या पोस्टला असंवेदनशील आणि अपमानास्पद म्हटले आहे. तसेच अनेकांनी प्रकाश राज यांना भारताच्या ऐतिहासिक चंद्र मोहिमेसाठी जबाबदार असलेल्या वैज्ञानिकांबद्दल आदर दाखवण्याचे आवाहन केले आहे.

त्याचे झाले असे की, प्रकाश राज यांनी त्यांच्या ट्विटवर एक मीम शेअर केलं आहे. यात एक फोटो आहे. यात इस्रोचे माजी संचालक के. सिवन यांचं कार्टुन आहे. यात के सिवन हे चहा ओतत असल्याचं पाहायला मिळतंय. हा फोटो शेअर करतानाच त्यांनी ब्रेकिंग न्यूज; विक्रम लँडरकडून चंद्रावरील पहिला फोटो येत आहे. वॉव.. असं म्हणत #justasking हा हॅशटॅगही वापरला आहे.

प्रकाश राज यांच्या ट्विटनंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर प्रचंड टीका केली जात आहे. एका युझरनं म्हटलं आहे की, कमीत कमी संसाधने, कमी बजेट, देशातलं वातावरण असं असतानाही इस्रो करत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. सगळ्याच देशांना हे जमतंच असं नाही. आपला देश हे करतोय, त्याचा अभिमान असायसा हवा, असं म्हटलं आहे. अनेकांनी प्रकाश राज यांचे कान टोचले आहेत.