राजसाहेबांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व मुस्लिम बंधूंचे आभार – मनसे

मुंबई – जिथे जिथे भोंग्यावरून बांग दिली जाते तिथे तिथे भोंग्यावरून हनुमान चालीसाचे(Hanuman Chalisa)  पठण करावे, असे आवाहन करीत मनसेचे प्रमुख राज ठाकरे(MNS chief Raj Thackeray)  यांनी भोंग्यांचा त्रास काय होतो हे त्यांनाही समजू दे, असं म्हटलं आहे. देशभरात प्रत्येक राज्यात आपापल्या सत्ताधाऱ्यांना हिंदुची ताकद(The strength of Hindus)  दाखवून द्या, असा आदेश राज यांनी कार्यकर्त्यांना दिला. राज ठाकरे यांनी बुधवारपासून भोंग्यांविरोधात आंदोलन सुरू करण्याचे आवाहन करणारे पत्र प्रसारित केले असून याच पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक शहरांमधील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय.

ठाण्यातील मनसैनिकांनी आज पहाटे झालेल्या अजानचा विरोध करत लाऊडस्पीकर वर हनुमान चालिसा लावली. पहाटे 5.14 मिनटांनी ठाणे इंदिरा नगरमधील एका मशिदीवर अजान झाली. त्याचा विरोध म्हणून मनसे कार्यकर्ते पप्पू कदम यांनी या मशिदीच्या जवळच असलेल्या इंदिरा डोंगरावरच्या महालक्ष्मी मंदिरात भोंगा लावून हनुमान चालिसा पठण सुरू केलं. तर कल्याण डोंबिवलीमध्ये 50 हून अधिक कार्यकर्त्यांना पोलीस यंत्रणेकडून नोटीस पाठविण्यात आल्या होत्या.

एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला आज पनवेलमध्ये सकाळी ४: ५० व ६: ०८ ची अजाण लाऊड स्पिकरवर न होता फक्त तोंडाने बोलून झाली …! पनवेलचे शहराध्यक्ष योगेश चिले यांनी याबाबत मुस्लीम धर्मियांचे आभार मानले. ते म्हणाले, मा. राजसाहेबांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व मुस्लिम बंधूंचे आभार … ! पनवेल शहर पोलिसांनी सुद्धा कायदा सुव्यवस्था राखायला मदत केली …! या पुढेही अशीच अजाण लाऊड स्पीकरवर न देता तोंडी द्यावी. जर या पुढे लाऊड स्पिकर अजाण दिली गेली तर हनुमान चालिसा सुद्धा लाऊडस्पिकरवरच ऐकावी लागेल ..!.असं ते म्हणाले.