‘रिक्षावाल्यांचा अपमान करणाऱ्या पवारांचा करावा तेवढा निषेध कमी आहे’

Arvind sawant : ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्या वक्तव्याने एक नवा वाद निर्माण झाला आहे. सावंत यांनी महाविकासआघाडी सरकारच्या स्थापनेवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या एका मोठ्या विधानाबाबत गौप्यस्फोट केला आहे. “काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री राहिलेले दिग्गज नेते आहेत. त्यांनी रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करायचं का?” असा प्रश्न शरद पवारांनी विचारल्याचं अरविंद सावंत यांनी सांगितलं. तसेच मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवारांनीच उद्धव ठाकरेंना गळ घातल्याचं नमूद केलं.

अरविंद सावंत म्हणाले, “शरद पवार म्हणाले होते की, काँग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण असे दोन दोन मुख्यमंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छगन भुजबळ, जयंत पाटील, अजित पवार यांच्यासारखे दिग्गज नेते आहेत. ते या रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का? असा सवाल केल्याचा दावा त्यांनी केला आहे. पुढे ते म्हणाले,  असं असूनही उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंचं नाव दिलं होतं. यानंतर शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना गळ घातली. हे शिवधनुष्य उद्धव ठाकरेंनाच घ्यावं लागेल असं शरद पवार म्हणाले, अशी माहिती अरविंद सावंत यांनी दिली.

दरम्यान, या मुद्द्यावरून आता भाजप प्रवक्ते प्रवीण अलई (BJP spokesperson Pravin Alai)यांनी अरविंद सावंत यांच्यावर शरसंधान केले आहे. ते म्हणाले, अरविंद सावंत यांनी दावा केला आहे की, मा शरद पवार म्हणाले होते, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री राहून काम केलेले दिग्गज नेते आहेत. त्यांनी रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करायचं का? या निमित्ताने मला एकच सांगायचे आहे की, ही विशिष्ट विचारसरणीची लोकं बाहेर स्वतःला पुरोगामी म्हणवून घेतात. पण आतून किती तोकड़े विचार करतात हेच यातून लक्षात येते. रिक्षावाले प्रचंड मेहनत करतात, दिवस रात्र प्रवासी वाहतूक करीत कष्टाने जीवन जगतात. त्यांना अशा पध्दतीने कामावरून हिणवून अपमानित करणे मा पवार साहेबां सारख्या जेष्ठ नेत्याला शोभा देत नाही. रिक्षावाल्यांचा अपमान करणाऱ्या पवारांचा करावा तेवढा निषेध कमी आहे. या अपमानाचा बदला रिक्षावाले आगामी निवडणुकीत नक्की घेतील. या पैशाचा माज असणाऱ्या पुढाऱ्यांना नक्कीच अद्दल घडवतील. असं अलई यांनी म्हटले आहे.