सामान्य घरातील माणसं राज्य चालवतात, हे त्यांना बघवत नाही – चंद्रकांत पाटील

Arvind sawant : ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी महाविकासआघाडी सरकारच्या स्थापनेवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या एका मोठ्या विधानाबाबत गौप्यस्फोट केला आहे. “काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री राहिलेले दिग्गज नेते आहेत. त्यांनी रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करायचं का?” असा प्रश्न शरद पवारांनी विचारल्याचं अरविंद सावंत यांनी सांगितलं. तसेच मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवारांनीच उद्धव ठाकरेंना गळ घातल्याचं नमूद केलं.

अरविंद सावंत म्हणाले, “शरद पवार म्हणाले होते की, काँग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण असे दोन दोन मुख्यमंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छगन भुजबळ, जयंत पाटील, अजित पवार यांच्यासारखे दिग्गज नेते आहेत. ते या रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का? असा सवाल केल्याचा दावा त्यांनी केला आहे.

पुढे ते म्हणाले, असं असूनही उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंचं नाव दिलं होतं. यानंतर शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना गळ घातली. हे शिवधनुष्य उद्धव ठाकरेंनाच घ्यावं लागेल असं शरद पवार म्हणाले, अशी माहिती अरविंद सावंत यांनी दिली.

दरम्यान, अरविंद सावंतांच्या या वक्तव्यावर सत्ताधारी शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी जोरदार टीका केली. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर निशाणा साधला. हा श्रमशक्तीचा अपमान आहे, सामान्य घरातील माणसं राज्य चालवतात, हे त्यांना बघवत नाही, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. दुसरीकडे महाविकासआघाडीच्या नेत्यांनी अरविंद सावंत यांच्या या वक्तव्यावरून हात झटकले. शरद पवारांनी असं कधीही म्हणलं नाही, असं अजित पवार म्हणाले आहेत.