कोविड काळात गरोदर महिला कर्मचारी आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यापासून मिळणार सूट

नवी दिल्ली-  कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर गरोदर महिला कर्मचाऱ्यांना आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यापासून सूट देण्यात आली आहे. मात्र त्यांना कामासाठी उपलब्ध राहणे आणि घरून काम करणे आवश्यक असेल, असे केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार, निवृत्ती वेतन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंह यांनी आज सांगितले. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (DoPT) जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांबद्दल त्यांनी माहिती दिली.

प्रतिबंधात्मक क्षेत्रात राहणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संबंधित परिसर कंटेनमेंट झोन सूचीतून वगळण्यात येईपर्यंत कार्यालयात येण्यापासून सूट दिली जाईल, असेही ते म्हणाले. मंत्र्यांनी पुढे माहिती दिली की, अवर सचिव स्तराखालील सरकारी कर्मचाऱ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती प्रत्यक्ष संख्याबळाच्या 50% इतकी मर्यादित करण्यात आली आहे आणि उर्वरित 50% कर्मचाऱ्यांनी घरून काम करावे. त्यानुसार संबंधित सर्व विभागांकडून रोस्टर तयार केले जाईल, असेही ते म्हणाले.

मात्र, जे अधिकारी/कर्मचारी कार्यालयात हजर राहत नाहीत आणि घरून काम करत आहेत, ते कायम दूरध्वनी आणि इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर उपलब्ध राहतील, असे सिंह यांनी नमूद केले.

विषाणू संसर्गाचा झपाट्याने होणारा प्रसार लक्षात घेऊन कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाचे कार्यालयीन निवेदन (DoPT O.M.) जारी करण्यात आले आहे. त्याद्वारे अधिकृत बैठका शक्यतोवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित केल्या जातील असा सल्ला जारी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे, आवश्यकतेखेरीज अभ्यागतांशी वैयक्तिक भेटी, टाळल्या पाहिजेत, असे ते म्हणाले.

दरम्यान, कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने सर्व अधिकारी/कर्मचाऱ्यांना कोविड प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करण्याचा सल्ला दिला आहे. यात, हात/स्वच्छता वारंवार धुणे, मास्कचा वापर आणि नेहमी सामाजिक अंतर राखणे.

कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या कार्यालयीन निवेदनानुसार (DoPT O.M.) जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना 31 जानेवारी 2022 पर्यंत लागू राहतील. या दरम्यान, वेळोवेळी नियमित पुनरावलोकन केले जाईल आणि परिस्थितीनुसार मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा केली जाऊ शकते, असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले.