राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उत्तर; वाचा ‘या’ पाच मोठ्या गोष्टी

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत उत्तर दिलं. यावेळी नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा उल्लेख करून गेल्या 75 वर्षांच्या तुलनेत या माध्यमातून आपण देशाला अधिक वेगाने प्रगती देऊ शकतो, असे सांगितले.

नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, कोरोना संकटात भारताने जे काही केले, त्याचे संपूर्ण जग कौतुक करत आहे. भारताने कोरोनाचा खंबीरपणे सामना केला आणि 130 कोटी भारतीयांनी देखील केला. भारत सध्या 100 टक्के लसीकरणाच्या उद्दिष्टाकडे वेगाने वाटचाल करत आहे. परंतु तरीही कोरोना महामारी आपल्यासमोर मोठं आव्हान आहे. तो प्रत्येक वेळी रंग बदलत आहे.

राज्यसभेत मोदी यांनी सांगितले की, कोरोना संकटाच्या काळात आम्ही देशभरातील गरिबांना रेशन देण्याचे काम केले. या दरम्यान केंद्र सरकारने 80 कोटीहून अधिक देशवासियांना मोफत रेशन देऊन जगासमोर एक आदर्श ठेवला आहे.

गरीबांना घरे देण्याचे कामही आमचे सरकार करत आहे. कोरोनाच्या काळात देशातील ५ कोटी गरीब कुटुंबांना नळातून पाणी देण्याचे काम करण्यात आले. कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पीक घेतले आणि एमएसपीवर विक्रमी खरेदीही त्या पिकांची झाली. त्याचबरोबर बेरोजगारी बद्दल सध्या विरोधकांकडून नकारात्मक गोष्टी सांगितल्या जात आहेत, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.