जगात कुठे ना कुठे युद्ध चालू झालं की हिंदुत्ववाद्यांना आनंद होतो – विश्वंभर चौधरी 

 पुणे – रशिया आणि युक्रेनमधलं युद्ध आता गंभीर वळणावर येऊन ठेपलं आहे. रशियन फौजा थेट युक्रेनची राजधानी कीवमध्ये धडकल्या आहेत. युद्धाच्या दुसऱ्याच दिवशी रशियन फौजांनी कीवमध्ये मार्च केलं असून महत्त्वाच्या इमारतींना लक्ष्य केलं जात आहे. दुसरीकडे युक्रेनच्या फौजा देखील रशियन फौजांचा प्रतिकार करत आहेत.

युक्रेन-रशियामध्ये सुरु असणाऱ्या संघर्षाकडे सर्वांचे लक्ष लागले असताना दुसऱ्या बाजूला भारताच्या भूमिकेकडे सुद्धा अवघ्या जगाचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी फेसबुकवर एक पोस्ट करून हिंदुत्ववाद्यांना लक्ष्य केले आहे. चौधरी आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, हिंदुत्ववादी खूश आहेत. जगात कुठे ना कुठे युद्ध चालू झालं की यांना आनंद होतो. काही तर त्याचं निमित्त करून गांधीची अहिंसा कशी जगात कुठंच चालत नाही वगैरे तारे तोडत आहेत.

गंमत अशी की रशिया एक तर कम्युनिस्ट आणि त्यात पुन्हा नेहरूंचा प्रशंसक म्हणून त्यांना एरवी वर्ज्य असतो. मोदी अमेरिकेला अनाठायी मिठ्या मारतात हे ही एक उदाहरण. पण मारामारी कोणीही करो, अगदी शत्रूनंही केली तरी यांना आनंद होतो. शेवटी हिंसा होण्याशी कारण. त्यात आजकाल विश्वगुरू पदाचे वेध लागलेले आहेत म्हणल्यावर प्रत्येक मंदीत यांना संधी दिसते. युक्रेन आणि रशिया दोहोंना एका हद्दीपुरतं वळवळ करू देतील आणि मग मोदीच दोघांना ठणकावून शांत करतील हे त्यांचं स्वप्नरंजन. कालांतरानं रशिया आणि युक्रेनही हिंदूराष्ट्र बनेल यात त्यांना शंकाच नाही!

दुसरं टोक पण आहे . काही कम्युनिस्ट मित्रांच्या पोस्ट्स पाहिल्या. त्यांच्यामते रशिया बिचारा किती काळ अमेरिकेची दादागिरी सहन करणार? आता खरंच सहन होत नाही म्हणून पुतिन या सहिष्णू मार्गावर चालतोय! पुतिनची हुकूमशाही, जिथं निवडणूकाच होत नाहीत, त्यांना ‘कल्याणकारी हुकूमशाही’ वाटत असावी. रशिया आणि चीनमधली हुकूमशाही त्यांना आक्षेपार्ह वाटत नाही. भारतातल्या नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी आग्रही राहताना (अर्थात ते रहायलाच पाहिजे), रशिया आणि चीनमधल्या लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल ते बोलत नाहीत.