मोठी बातमी: एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे येणार एकत्र?

Mumbai: महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) गेल्या काही महिन्यांत बरेच चढ-उतार पाहायला मिळाले आहेत. अडीच वर्षांपूर्वी वेगवेगळ्या विचारधारेचे पक्ष एकत्र आले आणि महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. त्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपशी हात मिळवला आणि महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आले. यादरम्यान आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे, MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray), राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यातील वाढत्या जवळीकतेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे. आज (२१ ऑक्टोबर) हे तिन्ही दिग्गज नेते मंडळी पहिल्यांदा एकत्र येणार आहेत.

आजपासून संपूर्ण भारतात दिवाळी सणाला सुरुवात होत आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवसाच्या निमित्ताने मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये मनसेतर्फे दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी आमंत्रण दिले आहे. शिवाजी पार्क दीपोत्वसाचे उद्घाटन एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. उद्घाटनासाठी मुख्यमंत्री शिंदे आज संध्या ४ पर्यंत शिवाजी पार्कवर पोहोचू शकतात. अशात पहिल्यांदाच राज ठाकरे, शिंदे आणि फडणवीस ही तिकडी एकत्र दिसेल.

दरवर्षी मनसेच्या वतीने दिवाळीच्या निमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मनसेच्या वतीने शिवाजी पार्कवर दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. याचा शुभारंभ आज वसुबारसेपासून होणार आहे. या कार्यक्रमाला मनसे प्रमुख राज ठाकरे दरवर्षी उपस्थित असतात. यंदा मात्र, त्यांच्यासमवेत दिग्गज नेते मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याने राजकीय वर्तुळात त्यांच्या एकत्रीकरणाची चर्चा सुरु आहे.

यापूर्वीही भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री बनल्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांची प्रशंसा केली होती. त्यानंतर फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली होती. तसेच गणेशोत्वसादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या निवासस्थान शिवतीर्थवर गेले होते. यानंतर आता हे तिघे शिवाजी पार्कवर एकत्र जमणार असल्याने त्यांच्यात युती होण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.