दोन वेळच्या विश्वविजेत्या वेस्ट इंडिजचे फिरले ग्रह, टी२० विश्वचषकातून झाला ‘आऊट’

T20 World Cup: टी२० विश्वचषक २०२२ च्या साखळी फेरीत शुक्रवारी (२१ ऑक्टोबर) वेस्ट इंडिज विरुद्ध आयर्लंड (Ireland vs West Indies) संघात ‘करा वा मरा’ सामना झाला. या महत्त्वपूर्ण सामन्यात वेस्ट इंडिजचे गोलंदाज विशेष खेळ दाखवू शकले नाहीत. परिणामी त्यांनी ९ विकेट्सने हा सामना गमावला. या पराभवानंतर २ वेळच्या विश्वविजेत्या वेस्ट इंडिजवर टी२० विश्वचषकातून बाहेर होण्याची नामुष्की ओढावली आहे. साखळी फेरीतच त्यांचा प्रवास संपुष्टात आला आहे. दुसरीकडे ब गटातून आयर्लंड संघाने सुपर-१२ फेरीसाठी पात्रता मिळवली आहे.

हॉबर्ट येथे झालेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ५ बाद १४६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आयर्लंडच्या संघाने १७.३ षटकातच १ विकेट गमावत वेस्ट इंडिजचे आव्हान पूर्ण केले आणि ९ विकेट्सने सामना खिशात घातला.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजकडून ब्रेंडन किंगने एकाकी झुंज दिली. त्याने ४८ चेंडूत १ षटकार व ६ चौकारांच्या मदतीने नाबाद ६२ धावा केल्या. परंतु त्याला इतरांची साथ मिळाली नाही. त्याला वगळता फक्त जॉनसन चार्ल्स २४ धावा करू शकला. इतरांना २० पेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत. परिणामी वेस्ट इंडिजचा संघ १४६ धावांवरच गुंडाळला गेला. या डावात आयर्लंडकडून गरेथ डेलॅनी याने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरात आयर्लंडकडून सलामीवीर पॉल स्टर्लिंग आणि यष्टीरक्षक लॉर्कन टर्कर यांनी मोठ्या खेळी केली. स्टर्लिंगने ४८ चेंडूत नाबाद ६६ धावा केल्या. यादरम्यान त्याने २ षटकार आणि ६ चौकारही मारले. तसेच टर्करने नाबाद ४५ धावांचे योगदान दिले. या दोघांच्या खेळीमुळे आयर्लंडने १८व्या षटकातच सामना जिंकला.

यासह वेस्ट इंडिजचा संघ टी२० विश्वचषकाच्या टॉप-१० मधून बाहेर होणारा पहिला संघ बनला आहे. त्यांना साखळी फेरीतील ३ पैकी फक्त सामना जिंकता आला आहे. तर आयर्लंडचा संघ ३ पैकी २ सामने जिंकत सुपर-१२ मध्ये पोहोचला आहे. आता आयर्लंडचा संघ सुपर-१२ मध्ये कोणत्या गटाचा भाग बनेल याचा निर्णय स्कॉटलँड विरुद्ध झिम्बाब्वे संघातील सामन्याच्या निकालावर अवलंबून असेल.