‘स्वाक्षरी मोहिम, पोलिसांकडे तक्रार ते महाराष्ट्र सैनिकाची मदत’; भोंगे उतरविण्यासाठी राज ठाकरेंचं जनतेला पत्र

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गेल्या काही दिवसांपासून मशीदीवरील भोंग्याविरोधात (Loudspeaker Row ) रणशिंग फुंकलं आहे. कित्येक वेळा अजानच्या वेळी हनुमान चालीसाही (Hanuman Chalisa) चालवण्यात आली. यावरून बराच वाद रंगला मात्र आता राज ठाकरेंनी मनसे सैनिकांना पत्राद्वारे नवे आदेश दिले आहे. भोंग्याचा विषय आपल्याला कायमचा संपवायचा आहे. त्यामुळे पत्राद्वारे घराघरात पोहोचा, त्याशिवाय आंदोलन यशस्वी होणार नाही, असे पत्र राज ठाकरे यांनी कार्यकर्तांना लिहिले आहे.(Raj Thackeray’s letter to the people)

राज ठाकरे यांचं पत्र जसंच्या तसं

महाराष्ट्रातील माझ्या बंधू-बघिणी आणि मातांनो, सस्नेय जय महाराष्ट्र! मशिदींवरील भोंगे काढण्यात यावेत ही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेली होती आणि भोंगे उतरविण्यासाठी 4 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिलेला होता. त्यानंतर इतिहासात पहिल्यांदाच मशिदींवरील भोंगे उतरले. पहाटेचे अजाण बंद झाले. दिवसभरातल्या बांगा सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्यानुसार कमी आवाजात होऊ लागल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील 92 टक्के मशिदींमध्ये मनसेच्या आंदोलनानंतर हा परिणाम दिसून आला. भोंगे उतरवा ही मागणी नवी नाही. स्वातंत्र्योत्तर काळात ही मागणी अनेकांकडून करण्यात आली. पण त्यावर कुणालाही उत्तर सापडले नाही. अनेकजण न्यायालयात गेले. न्यायालयांनी भोंग्याविरोधात कारवाई करा, असं सांगितलं. तर सर्वोच्च न्यायालयाने भोंग्यांमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदुषणाची त्रासाची दखल घेत डेसिबलची मर्यादा घातली. तरीही देशभरात भोंग्यांचा धुमाकूळ सुरुच होता.

अखेर लाऊडस्पिकरवरची तुमची अजाणबाण थांबली नाही, तर आम्ही भोंग्यांवर हनुमान चालीसा लावू, असं आम्ही ठणकावून सांगितल्यानंतर चित्र बदललं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचा हा पर्याय समस्त हिंदू बांधवांबरोबरच बघिणींनाही आवडला. म्हणूनच तर भोंगे हटवा विचाराचे लोण देश-विदेशात पसरलं. त्यामुळे राज्यातील यंत्रणांना भोंग्यांबाबत गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली. त्याचा परिणामही आपल्या सर्वांना दिसून आला. उत्तर प्रदेशात योगींच्या सरकारने हजारो मशिदींवरचे भोंगे उतरवले. माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी राज्यभरात असंख्य ठिकाणी आंदोलनं केली. राज्यभरात माझे 28 हजार महाराष्ट्र सैनिकांना नोटीस बजावली. अनेकांना अटकही केली. तर अनेकांना तडीपारी लावली. या देशाचं दुर्देव हेच की या देशात नियम मोडणाऱ्यांना सर्व मोकळीक मिळते. पण नियम पाळणाऱ्याचा आग्रह धरणाऱ्यांना शिक्षा होते.

असो, एक लक्षात घ्या भोंगे हटवा हे आंदोलन थांबलेलं नाही. आपण सर्वांच्या आशीर्वादाने हे आंदोलन सुरुच राहील. या आंदोलनात आपला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हातभार असायलाच हवा. एक सुजाण नागरिक म्हणून आपण पुढील सुचनांचं पालन केलं तर भोंग्यांचा हा प्रश्न कायमचा निकाली काढता येईल. तुम्हा काही जणांना कदाचित याचा थेट त्रास होत नसेलही. पण तुम्ही त्याबाबत इतरांना सांगू शकता.

1) सर्वोच्च न्यायालयाने भोंग्यांसाठी सांगितलेली मर्यादा ही जास्तीत जास्त 45 ते 55 डेसिबल (स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या मिक्सर इतकी) इतकाच असला पाहिजे. जिथे जिथे या नियमाचं पालन होत नसेल तिथे तुम्ही स्वाक्षरी मोहीम राबवून स्थानिक पोलिसांना कळवावं. पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर कारवाई करण्यात आली नाही तर संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर न्यायालयाचा अवमान केल्याचा ठपका लागू शकतो.

2) लाऊडस्पीकरच्या आवाजाचा त्रास झाल्यास तुम्ही घरातूनच स्वत:च्या मोबाईलवरुन 100 क्रमांक डायल करुन पोलिसांना माहिती देऊ शकता. पोलिसांना ट्विटर आणि फेसबुकवर टॅग करुनही तुम्ही ही माहिती देऊ शकता. कोणत्याही प्रकारे तुम्ही पोलिसांकडे तक्रार केली तर त्या तक्रारीची नोंद स्वत:कडे ठेवायला विसरु नका.

3) सर्वात महत्त्वाचं. माझं हे पत्र तुमच्या घरी घेऊन येणाऱ्या महाराष्ट्र सैनिकाचं नाव, मोबाईल क्रमांक तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करुन ठेवा. कोणत्याही संकटात, अडीअडचणीच्यावेळी माझा हा महाराष्ट्र सैनिक तुमच्यासाठी धावून येईल.