तिसऱ्या उमेदवारासाठी आमच्याकडे पहिल्या पसंतीची ३२ जादा मते आहेत – चंद्रकांत पाटील

मुंबई – राज्यसभा निवडणुकीमुळे (Rajya Sabha elections) सध्या राज्यातील वातावरण तापले असून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरुद्ध भाजप (BJP) असा जोरदार संघर्ष यानिमित्ताने पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीकडून एका बाजूला आपले उमेदवार विजयी होतील असा दावा करत असताना भाजपकडून देखील आपले उमेदवार सहज विजय मिळवतील असा दावा केला जात आहे.

दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil) यांनी आता राज्यसभा निवडणुकीबाबत भाष्य केले आहे. पाटील म्हणाले की, भाजपाचे तीन राज्यसभा सदस्य निवृत्त होत असल्याने पक्षाने तीन उमेदवार निवडणुकीस उभे केले आहेत. भाजपाच्या संख्याबळानुसार दोन उमेदवार सहज निवडून येतात व त्याखेरीज तिसऱ्या उमेदवारासाठी आमच्याकडे पहिल्या पसंतीची ३२ जादा मते आहेत. त्यामुळे या जागेसाठी आमचाच दावा आहे.

महाविकास आघाडीकडे किती जास्त मते आहेत, हे त्यांनी सांगावे. या निवडणुकीत मतदारांनी पक्षाच्या प्रतिनिधीला मत दाखवायचे असले तरी व्हिप पाळला नाही म्हणून आमदारकी रद्द करता येत नाही. अपक्षांनी तर त्यांचे मत कोणालाही दाखवायचे नाही. अशा स्थितीत आमदारांनी सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून मतदान करावे. महाविकास आघाडीनेही वस्तुस्थिती मान्य करावी आणि अनावश्यक तणाव दूर करावा, असे आमचे आवाहन आहे. भाजपाचे महाराष्ट्रासाठीचे राज्यसभा निवडणूक प्रभारी म्हणून केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Union Railway Minister Ashwini Vaishnav) यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.