कॉमेडियन राजपाल यादव संकटात! स्कूटरने विद्यार्थ्याला मारली धडक, पोलिसात तक्रार दाखल

बॉलीवूडचा ‘कॉमेडी अभिनेता’ राजपाल यादव (Rajpal Yadav) अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. प्रयागराजमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एका विद्यार्थ्याने राजपाल यादववर स्कूटरने टक्कर मारल्याचा आरोप केला आहे. याउलट राजपाल यादवनेही विद्यार्थ्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा कर्नलगंज पोलीस ठाण्याअंतर्गत तपास सुरू आहे.

राजपालने विद्यार्थ्याला मारहाण केली
खरे तर हे संपूर्ण प्रकरण एका शूटिंगदरम्यान घडले आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारा बालाजी हा विद्यार्थी विद्यापीठ बँक रोडजवळ पुस्तके खरेदी करत होता. तिथे चित्रपटाचे शूटिंग सुरू होते, ज्यात कॉमेडियन राजपाल यादव स्कूटर चालवत होता. या स्कूटरचा नोंदणी क्रमांक UP 70- E- 7097 होता. राजपालला ती स्कूटर नीट चालवता येत नव्हती. त्यामुळे स्कूटरचे संतुलन बिघडले आणि ती तिथे उभ्या असलेल्या विद्यार्थ्याच्या मोटरसायकलला धडकली.

विद्यार्थ्याने याला विरोध केला असता युनिटमधील लोकांनी त्याच्याशी गैरवर्तन केले. विद्यार्थ्याने तक्रारीत म्हटले आहे की, युनिटमधील लोकांनी आपल्याशी गैरवर्तन केले आणि मारामारी सुरू केली. त्याचवेळी जीवे मारण्याची धमकीही दिली.

शूटिंग यूनिटनेही तक्रार दाखल केली
विद्यार्थ्याच्या तक्रारीनंतर शूटिंग युनिटकडूनही तक्रार दाखल करण्यात आली होती. परवानगीनुसार होत असलेल्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये अडथळा आणल्याबद्दल युनिटने विद्यार्थी बालाजीविरुद्ध कर्नलगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. चित्रपटाच्या टीमने आरोप केला आहे की, नकार देऊनही हा मुलगा मोबाईलने व्हिडिओ बनवत होता. जेव्हा आम्ही त्याला थांबण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने युनिटमधील लोकांशी भांडण सुरू केले, ज्यामुळे शूटिंगदरम्यान अडथळा निर्माण झाला.

सध्या कर्नलगंज पोलिस ठाण्याचे प्रभारी राममोहन राय यांनी सांगितले की, त्यांच्याकडे दोन्ही बाजूंच्या तक्रारी आल्या आहेत. चौकशीनंतर आवश्यक ती कारवाई केली जाईल. मात्र, साक्षीदाराच्या म्हणण्यानुसार, स्कूटर चालवताना क्लच वायर तुटली, त्यामुळे स्कूटरचे नियंत्रण सुटले आणि ती जवळच उभ्या असलेल्या रिक्षाला धडकली. त्यामुळे शेजारी उभा असलेला विद्यार्थी बालाजी यालाही दुखापत झाली. यावरून गदारोळ झाला आहे.