“सलमानपासून दूर राहा नाहीतर तुला…”, लॉरेन्स बिश्नोई गँगची ड्रामा क्विन राखी सावंतला धमकी

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि एंटरटेनमेंट क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) या दोघांचे नाते सर्वश्रुत आहे. राखी सलमानला आपला भाऊ मानते. त्याचबरोबर सलमानही भाऊ होण्याचे कर्तव्य पार पाडतो आणि प्रत्येक कठीण प्रसंगी राखीच्या पाठीशी उभा राहतो. कदाचित त्यामुळेच राखी आणि सलमानच्या नाते आता गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या डोळ्यात खुपू लागले आहे. सलमान खाननंतर आता लॉरेन्स बिश्नोई गँगने (lawrence Bishnoi Gang) राखी सावंतला धमकी दिली आहे.

राखीला धमकीचे ईमेल
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने राखी सावंतला धमकीचे (Rakhi Sawant Received Threat) ईमेल पाठवले असून, अभिनेत्रीला सलमान खानपासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे. मुंबईत कडेकोट सुरक्षा असतानाही ते सुपरस्टार सलमान खानला मारतील, असा दावाही बिश्नोईच्या टोळीने ईमेलमध्ये केला आहे.

राखीने आता ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत धमकीच्या ईमेलची माहिती दिली आहे. राखीने सांगितले, “ते (लॉरेन्स बिश्नोई गँग) म्हणत आहेत की जर तू सलमान खानच्या बाजूने बोललीस तर आम्ही तुला मारून टाकू. पण मी सलमान खानबद्दल बोलेन कारण माझी आई आजारी असताना त्याने मला मदत केली होती. माझ्या आईला कॅन्सरपासून वाचवण्यासाठी त्याने 50 लाख रुपये खर्च केले होते. मी त्याच्याबद्दल का बोलू नये? त्यांनी (लॉरेन्स बिश्नोई टोळीने) सिद्धू मुसेवालालाही मारले. एखादी व्यक्ती जिवंत असताना आपण त्याच्या बाजूने भूमिका घ्यायला नको का?”

तिला मिळालेल्या धमकीच्या ईमेलसाठी ती कोणतीही कायदेशीर कारवाई करत नसल्याचेही राखीने सांगितले. अभिनेत्री म्हणाली, “मी कोणतीही कारवाई करत नाहीये. मी घाबरले आहे आणि गोंधळले देखील. मला कळत नाही मी काय करू? हे मी देवावर सोडते.”

राखीला धमकीचे ईमेल कधी आले?
राखीला प्रिन्स माफी नावाच्या व्यक्तीकडून दोन ईमेल मिळाले आहेत, जो गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीचा असल्याचा दावा करतो आणि त्याचे गोल्डी ब्रार गटाशी संबंध आहेत. पहिला ईमेल राखीला 18 एप्रिलला सकाळी 7.22 वाजता पाठवण्यात आला होता आणि दुसरा ईमेलही त्याच दिवशी दुपारी 1.19 वाजता पाठवण्यात आला होता.

पहिल्या ईमेलमध्ये काय लिहिले होते?
राखी सावंतला आलेल्या धमकीच्या ईमेलमध्ये लिहिले होते, “राखी, आमचे तुझ्याशी भांडण नाही. सलमान खानच्या प्रकरणात अडकू नको, अन्यथा तुला खूप अडचणींना सामोरे जावे लागेल. तुझा भाऊ सलमानला आम्ही मुंबईतच मारून टाकू. त्याने कितीही सुरक्षा वाढवली तरी हरकत नाही. यावेळी तो सुरक्षेतच मारला जाईल. शेवटचा इशारा तुझ्यासाठी आहे. अन्यथा तू तयार असणे आवश्यक आहे.”

दुसऱ्या ईमेलमध्ये काय लिहिले होते?
दुसऱ्या ईमेलमध्ये लिहिले होते, “राखी, आम्ही तुला शेवटचे समजावून सांगत आहोत. यानंतर बोलणार नाही. सलमान खानला कोणीही वाचवू शकत नाही. आम्हाला कोणाचीच भीती नाही. सलमानचा गर्व मोडावा लागेल. त्याच्यामध्ये पैसा आणि सत्तेचा खूप अभिमान आहे. एकतर त्याने भाऊ गोल्डीशी बोलावे किंवा मरायला तयार व्हावे. लवकरच त्याला त्याच्या घराबाहेर मारले जाईल.”