चीनला मागे टाकत भारत बनला सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश, १४२.८६ कोटींवर पोहोचला आकडा

लोकसंख्येच्या बाबतीत भारताने चीनलाही मागे टाकले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार भारत आता जगातील सर्वाधिक लोकसंख्या (Worlds Most Population Country) असलेला देश बनला आहे. भारताची लोकसंख्या १४२.८६ कोटी तर चीनची लोकसंख्या १४२.५७ कोटी झाली आहे. भारताची लोकसंख्या आता चीनपेक्षा २९ लाखांनी वाढली आहे. १९५०नंतर पहिल्यांदाच भारताच्या लोकसंख्येने चीनला मागे टाकले आहे. पुढील वर्षी भारत लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकेल, असा अंदाज संयुक्त राष्ट्राने गेल्या वर्षी वर्तवला होता.

या संदर्भात, NFPA च्या ‘द स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट, २०२३’ ने बुधवारी आपला अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालाचे नाव आहे ‘८ बिलियन लाइव्ह, इनफिनिट पॉसिबिलिटीज: द केस फॉर राइट्स अँड चॉइस’. हे आकडे ‘डेमोग्राफिक इंडिकेटर्स’ या श्रेणीत दिलेले आहेत.

UNFPA च्या माध्यम सल्लागार ऍना जेफरीज म्हणाल्या, “होय, भारताने चीनला केव्हा मागे टाकले हे स्पष्ट नाही. खरेतर दोन्ही देशांची तुलना करणे खूप कठीण आहे. कारण दोन्ही देशांच्या डेटा कलेक्शनमध्ये थोडाफार फरक आहे. चीनची लोकसंख्या गेल्या वर्षी उच्चांकावर पोहोचली होती आणि आता ती कमी होऊ लागली आहे, हे या अहवालात स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर भारताची लोकसंख्या सध्या वाढत आहे. जरी भारताच्या लोकसंख्येच्या वाढीचा दर 1980 पासून घसरत आहे. याचाच अर्थ भारताची लोकसंख्या वाढत आहे पण तिचा दर आता पूर्वीच्या तुलनेत कमी झाला आहे.”

भारतात या वयोगटातील लोकांची सर्वाधिक लोकसंख्या आहे
भारतातील २५ टक्के लोकसंख्या ० ते १४ वर्षांच्या दरम्यान असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय १८ टक्के लोक १० ते १९ वयोगटातील आहेत. १० ते २४ वयोगटातील लोकांची संख्या २६ टक्के आहे. त्याच वेळी, १५ ते ६४ वर्षे वयोगटातील लोकांची संख्या ६८ टक्के आहे आणि ७ टक्के लोक ६५ च्या वर आहेत. चीनबद्दल बोलायचे झाल्यास, १७% ० ते १४ वर्षे, १२% १० ते १९, १० ते २४ वर्षे १८%, १५ ते ६४ वर्षे ६९% आणि ६५ वरील लोकांची संख्या १४% आहे.

२०५०पर्यंत लोकसंख्या १६६ कोटींवर पोहोचेल
यूएस सरकारच्या अहवालानुसार, १८ व्या शतकात लोकसंख्या सुमारे १२० दशलक्ष होती. १८२० मध्ये भारताची लोकसंख्या सुमारे १३.४० कोटी होती. १९व्या शतकापर्यंत भारताची लोकसंख्या २३ कोटींच्या पुढे गेली. २००१ मध्ये भारताची लोकसंख्या १०० कोटींच्या पुढे गेली. सध्या भारताची लोकसंख्या १४० कोटींच्या आसपास आहे. २०५० पर्यंत भारताची लोकसंख्या सुमारे १६६ कोटी असेल.