शिवसेना त्यांच्या कर्माची फळं भोगते, मग भाजपच्या नावाने आदळआपट का?

राम कुलकर्णी :  महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनासारखा (Shivsena) पक्ष जो सद्या कर्माची फळे भोगताना दिसतो. सनदशीर मार्गाचा अवलंब सोडून केवळ मुख्यमंत्री पदासाठी जनादेश डावलून 2019 ला राजकिय संक्रमण करत मांडलेला तमाशा हाच खर्‍या अर्थाने सद्याच्या वाताहतीचं कारण म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही. एकनाथ शिंदेंचा गट (Eknath Shinde Faction) 40 आमदार घेवून बाहेर पडणं असेल किंवा धनुष्यबाण नावासह कुलुप बंद करून ठेवणं असेल. हे सारं त्यांच्याच कर्माधिष्ठीत जीवनाची फळं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण या शिवसेनेच्या अंतर्गत घडामोडी चालु असताना उगीचच ही मंडळी  भाजपच्या नावाने आदळआपट का करते?

खरं तर परीक्षेत नापास झाल्यानंतर आत्मपरीक्षण केलं तर पुन्हा तो पास होतो. त्याहून अधिक राजकारणात आत्मक्लेश केल्यानंतर मिळालेलं ज्ञान शुद्धी करण्यासाठी कामी येतं जसं की अजित पवारांना आलं. हे सारं सोडून उठसूठ भाजपनं केलं असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करणं म्हणजे आहे ते अस्तित्व संपुष्टात आणण्यासारखं असंच म्हणावे लागेल. आश्चर्य या गोष्टीचं जी महिला उद्धव ठाकरेंच्या नावाने अगदी जाहिर बोंबा मारायची त्या पक्षात येवून हिंदुत्वाचं बाळकडू लोकांना पाजू लागली. यावरूनच खर्‍या अर्थाने शिवसेनेचा भगवा किती अवसानगळित गात्र झाला हे लक्षात घेण्यासारखं.

महाराष्ट्राच्या राजकारणात सद्या ज्या घडामोडी सुरू आहेत त्या पहाण्यापेक्षा जरा मागे डोकावून पहाणं महत्वाचं वाटतं. मुळात शिवसेना-भाजपची युती हिंदुत्वाच्या मुद्यावर 25 वर्षापासूनची ज्याचे साक्षीदार स्व.बाळासाहेब ठाकरे, स्व.प्रमोदजी महाजन, स्व.गोपीनाथराव मुंडे हे होते. वैचारिक आणि हिंदुत्वाचा अजिंडा तत्कालीन काळात समान होता. त्याच आधारावर युती भक्कमपणे टिकली. पण असं म्हणतात राजकीय स्वार्थ आला की मग तिथे वैचारिक भिंत कोसळून पडते. तसंच काही या दोन पक्षात झालं. खरं म्हणजे शिवसेना मोठी की भाजप मोठा? कुणी कुणाला मदत केली? कोण छोटा भाऊ? कोण लहान भाऊ? यापेक्षा एकमेकांच्या हातात हात घालून काम केल्यानंतर उद्दिष्ट प्राप्ती गाठण्यापर्यंत सारे गेले.

काही अपवाद संघर्ष झाले असतील तो भाग वेगळा. पण 2019 विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं अतिशय विचित्र भुमिका घेतली. खरं म्हणजे संजय राऊत हेच या सार्‍या घडामोडीचं केंद्र होतं. जनाधार काय होता?स्पष्टपणे राज्यातील मतदारांनी युतीला राज्य करण्यासाठी संधी बहुमताने दिली होती. पण केवळ मुख्यमंत्री पदासाठी नको त्या गोष्टी भाजपच्या माथी आदळल्या काय तर म्हणे? गृहमंत्री अमित शहा यांनी शब्द दिला होता. असा आरडाओरड छाती फुगवून केला. तत्पुर्वी बारामतीच्या दावणीला शिवसेनेला जायचं होतं. हे सत्य उघडं पडू नये म्हणून खापर भाजपवाल्यांच्या नावाने फोडलं. महाविकास आघाडीची स्थापना शिवसेनेच्या पुढाकाराने होणं हेच शिवसेनेसाठी फार मोठं पाप आणि कुकर्म म्हणावे लागेल. मग मुख्यमंत्री पदाची लालसा म्हणा त्याहून अधिक पवार घराण्यांचे प्रेम म्हणा एवढेच नाही ज्या स्व.बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्यात कधीही काँग्रेससमोर स्वाभिमान गहाण टाकला नाही. त्यांच्या दारात सुपुत्रांनी जावून केवळ एका पदासाठी लोटांगण घेतलं. हा एक पापाचा घडाच होता. हे सारं करताना मग हिंदुत्व गुंडाळून ठेवलं म्हणा किंवा लोक कल्याणाची कामं बाजूला ठेवणं म्हणा. वैचारिक अजिंडा अडीच वर्षात ऐशीतैशी झाली.

बाळासाहेबांचं हिंदुत्व चेहर्‍यावरसुद्धा शिवसेनेच्या दिसुन आलं नाही आणि आपले खरे रक्षणकर्ते जणुकाही राष्ट्रवादी आणि काँग्रेसवालेच आहेत या आविर्भावात मांडीला मांडी लावून बसताना जनाब म्हणा किंवा इतर अनेक नको त्या निर्णयापर्यंत जावून शिवसेना पोहोचली. खरं म्हणजे कुठल्याही पक्षात एका प्रमुखाने निर्णय घेतला तर सामुहिक घ्यायला हवा. महाविकास आघाडीसोबत जायला नको अशी भूमिका तत्कालीन काळातच आज बाहेर पडलेल्या अनेक आमदारांनी घेतलेली होती. पण एक गोष्ट लक्षात घ्या अनैतिक संबंधातून जन्मलेली संतती जिचा भांडाफोड कधी ना कधी होतो तसंच काही शिवसेनेबाबत घडलं. दरम्यानच्या काळात पक्षातील सहकार्‍यांना सहन झालं नाही. मुस्कटदाबी वाढली परिणाम सद्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असंतोषाला वाचा फोडताच एक-दोन नव्हे तब्बल 40 आमदार बाजुला पडले. नविन सरकारची निर्मिती झाली. दहा-बारा खासदारही शिंदे गटात आले. प्रश्न हा आहे या सार्‍या घडामोडीत भाजपचा दोष काय?

थेट शिवसेना फोडण्याचा भाजपनं किंचितही प्रयत्न केला नाही. अनेकदा आपलंच घर आपल्याला सांभाळता येत नाही हा कर्त्याचा कमकुवतपणा असतो. एकनाथ शिंदेसारखी माणसं हिंदुत्वाने प्रभावित होती त्यांनी आपला विचार कदाचित भाजपकडे मांडला असावा. शेवटी भाजपला अस्थिर सरकार नको आहे. शिवाय हिंदुत्व रक्षण महत्वाचं वाटतं. त्याहून अधिक सामान्य माणसाचं कल्याण हा पक्षाचा अजिंडा अशा वेळी शिंदे गटाला पाठिंबा देवून राज्यात नवीन सरकार बनवलं. एक गोष्ट लक्षात घ्या शिवसेनेनं 2019 मध्ये भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला.

कदाचित राजकियदृष्ट्या तो सुड पण नियतीनं उगवला असं म्हणता येईल. पण चार महिने झालं शिंदे-फडणवीस सरकार कशा प्रकारे जनहिताचा कारभार करताना लोक पहातात? अगदीच नाही म्हटलं तर अडीच वर्षात ठाकरे सरकारनं जे केलं नाही ते चार महिन्यात शिंदे-फडणवीसांनी करून दाखवलं. शिवसेना अंतर्गत वाताहतीला सामोरे जात असताना अस्तित्वावर वेळ आली. मग शिवसेना हे नाव असेल किंवा धनुष्यबाण हे चिन्ह असेल. कार परवा त्यांचं नाव आणि चिन्ह निवडणूक आयोगाने गोठून टाकलं. म्हणजे स्व.बाळासाहेब ठाकरेंनी ज्या शिवसेनेची स्थापना महाराष्ट्रात केली ती संघटना कायद्याच्या धर्तीवर शुन्य झाली. हे दुर्दैव आणि हे पाप केवळ त्यांच्या नेतृत्वाच्या कुकर्माचं आणि पापाचं फळ म्हणावे लागेल.

आज या सार्‍या घडामोडीत उद्धव ठाकरे, त्यांचे बगलबच्चे एवढेच नव्हे तर काल परवा ज्या सुषमा अंधारे शिवसेनेच्या नावाने जाहिरपणे भुमिका घेत विरोधात बोलायच्या. त्या आता शिवसेनेच्या रक्षणकर्त्या झाल्या आणि भाजपच्या नावाने बोंब ठोकू लागल्या. शेवटी राजकारणाचा आणि प्रत्येकाच्या अस्तित्वाचा तो भाग असतो. एखादा सरपंच जरी आता ठाकरेंच्या बाजुने बोलला तरीही तो त्यांच्या दृष्टीने उद्याचा हिरो असू शकतो.कारण तत्कालीन काळात मदतीला येणारा पाहुणा तो खरा पाहुणा. गंमत याची वाटते ही सारी मंडळी भाजपच्या नावाने का बोटं मोडते? एकनाथ शिंदे कशामुळे गेले? याचं आत्मपरीक्षण करण्यापेक्षा पेडणेकर सुद्धा भाजपच्याच नावाने बोंब ठोकतात.

संजय राऊतांचा आक्रोश पंतप्रधानापासून फडणवीसापर्यंत असायचा. अलीकडे अरविंद सावंत, चंद्रकांत खैरे आणि हो आता नव्याने झालेले विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, कोकणातले विनायक राऊत देखील ही मंडळी भाजपला दोष देते याचे नवल वाटते. अहो, सत्य कधी तरी यांनी मान्य करत उद्धव ठाकरेंना काय चुकलंय हे सांगायला हवं. आम्हाला मुख्यमंत्र्याचा शब्द दिला होता. ही आदळआपट म्हणजे स्वत:ची लाल स्वत:च करून घ्यायची असा प्रकार होय. बाकी काही असलं तरी शिवसेनेत राहिलेली ही मंडळी जेवढं भाजपच्या नावाने बोंबा मारतील तेवढं चांगलं वातावरण भाजपसाठी निश्चित तयार होताना दिसतं. कारण कुठे? काय चाललंय? आणि कोणी कुठे गडबड केली? या सार्‍या गोष्टी समाज तथा मतदार डोळे उघडे ठेवून पहात असतो. बाकी काही असलं तरी भाजपच्या नावाने आदळआपट करणं म्हणजे भाजपची लोकप्रियता वाढवण्यासाठी बळ देणं हे नक्कीच.