राणीसावरगाव : श्री रेणुका देवी तेल धुनी यात्रेला सुरुवात, देवी दर्शनासाठी देवी भक्तांची गर्दी

राणीसावरगाव/विनायक आंधळे : गंगाखेड (Gangakhed) तालुक्यातील डोंगराळ भागात वसलेल्या राणीसावरगाव (Ranisawargaon) येथील साडेतीन पिठांपैकी अर्धपीठ मानून गणले जाणारे श्री रेणुका देवीच्या (Renukadevi) तेल धुनी यात्रेस दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी सुरवात झाली. श्री रेणुका देवी दर्शनासाठी मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची मोठी गर्दी होत आहे. उत्सव काळात रात्री छबिना देवीची पालखी मिरवणूक नित्य नेमाने 11 दिवस मोठ्या थाटामाटात निघत असते.

10 एप्रिल सायंकाळी 5 ते 7 या वेळात मातोश्री भजनी मंडळ व 12 एप्रिलला कोरे गल्ली भजनी मंडळ यांचा भजन व गीताचा कार्यक्रम. अष्टमी तेल धुनी यात्रा दिनांक 13 एप्रिल रोजी संपन्न होणार आहे. 16 एप्रिलला श्री च्या गोंधळाने यात्रेची सांगता होईल. अंदाजे एक एकर जागेवर भव्य पुरातन इतिहासाची साक्ष देणारे भव्य दिव्या असे सुमारे 700 वर्षपूर्वीचे हेमाडपंती मंदिर (Hemadpanti Temple) आहे. दोन्ही बाजूच्या कमानी, भव्य मुख्य दरवाजा तसेच भक्त कल्लोळ तीर्थात भक्ती भावाने स्नान करतात यामुळे राणीसावरगावला ऐतिहासिक (Historical) महत्व प्राप्त झाले आहे. श्री रेणुका देवीला तीर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा प्राप्त आहे.

राणी सावरगाव हे देवी भक्तांचे माहेरघर म्हणून सर्व दूर परिचित आहे. देवी दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी महिला, पुरुष, बालगोपाल हे चैत्र यात्रा व दसरा यात्रा यामध्ये सहभागी होऊन दर्शनाचा लाभ घेतात. पूर्वी यात्रा काळात कुस्त्यांची दंगल व्हायची परंतु ती भांडण तंटांमुळे बंद करण्यात आली आहे. ती पुन्हा सुरू करावी अशी यात्रेकरूंची मागणी आहे. येणाऱ्या यात्रेकरूंसाठी मनोरंजनाची साधने वाढवण्यासाठी संस्थांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी भक्तांची व ग्रामस्थांकडून होत आहे. एकंदरीत यात्रेला प्रारंभ झाल्यापासून महाराष्ट्रातूनच (Maharashtra) नव्हे तर शेजारील कर्नाटक (Karnataka), आंध्रप्रदेश (Andhra Pradesh) राज्यातून भक्त राणीसावरगावात येऊन देवीची विधिवत पूजाअर्चा व सांस्कृतिक कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवताना भाविक मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. यात्रा पाहण्यासाठी व श्री रेणुका देवीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भक्तासाठी सर्व सोय करण्यात आली आहे. यामध्ये विश्वस्त मंडळ, मानकरी व सेवेकरी मंडळ आपआपली जबाबदारी चोख पार पाडत आहेत.

गावाचे जाधव पाटील हे देवीचे मानकरी आहेत. इतर समाजातील जातीय धर्मीयांना या ठिकाणी सेवेकरी मंडळात सहभाग असतो. माघील दोन वर्षांपासून संस्थेचे अध्यक्ष पद बाबुराव गळाकाटू यांच्याकडे आहे. सदरील देवीची मूर्ती स्वयंभू असून करून रूपात देवी चाफेकानडे लोहार महिलेच्या अर्थ हाकेला साथ देऊन मालावरील मूळपेठ डोंगरावर प्रगटली व ती गावात कायम वास्तव्य करून राहिली म्हणून राणीसावरगावला माहूरगडचे ठाणे म्हणून परिचित आहे.

हैद्राबाद (Hyderabad) येथील मूळ जागीरदार यांनी रेणुका देवी मंदिर परिसरात मार्बल फरशी बसून मोठ्या प्रमाणावर मंदिर परिसराचा चेहरा मोहरा बदलला आहे. भाविकाकडून देणगी स्वरूपात, विधी, पूजा, सोन्या-चांदीचे दाग दागिने, रोख रक्कम स्वरूपात देणगी प्राप्त होते. शेतीतून व शॉपिंग कॉम्पलेक्स मधील उत्पन्नातून बऱ्यापैकी उत्पन्न संस्थानाला प्राप्त होते. यामध्ये संस्थांनीही आर्थिक सहाय्य केले असल्याचे मोहनराव गळाकाटू यांनी यावेळी सांगितले.