ऋषी सुनक ठरतेय बेस्ट सेलर; दिगंबर दराडे लिखित पुस्तकाची आठ दिवसात तिसरी आवृत्ती

पुणे – ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (British Prime Minister Rishi Sunak) यांच्यावर पत्रकार दिगंबर दराडे(Journalist Digambar Darade)  यांनी लिहिलेलं पुस्तक बेस्ट सेलर ठरत आहे. अवघ्या पाच दिवसांमध्ये 2000 प्रतींची तिसरी आवृत्ती सुरू करण्यात आली आहे.

लंडन येथे जाऊन दराडे यांनी आपल्या पुस्तकामध्ये सुनक यांच्या व्यक्तीमत्वाच् विविध पैलू उलगडले आहेत. युवक युवतींकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे डिजिटल माध्यमांमुळे समोर आले आहे.

इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती व सुधा मूर्ती यांचे ते जावई आहेत. ज्या देशाने आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केले त्या देशाचा पंतप्रधान एक भारतीय वंशाचा आणि हिंदू आहे. या अभूतपूर्व घटनेने भारतीय म्हणून आपली छाती नक्कीच फुलून येत आहे.

एक स्थितप्रज्ञ, हिंदू संस्कृतीचा अभिमान बाळगणारे, मंदिरात जाऊन पूजा करणारे गोपूजा करणारे, गीतेवर हात ठेवून खासदारकीची शपथ घेणारे ब्रिटनचे पंतप्रधान पाहून भारतीयाला त्यांचा अभिमान वाटतो आहे. आपले कर्तव्य हाच आपला धर्म आहे हा विचार पक्का करून ते जोमाने कामाला लागले आहेत दिवस-रात्र मेहनत करत आहेत.

माय मिररचे मनोज अंबिके म्हणाले, ऋषी यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाला चांगला प्रतिसाद मिळत असून आठ दिवसांमध्ये आम्ही तिसरी आवृत्ती काढण्याचा निर्णय घेतला आहे. याच बरोबर हे पुस्तक विविध भाषांमध्ये आणण्याचाही आमचा संकल्प आहे.

मी ब्रिटिश नागरिक आहे. येथे माझे घर आहे. हा माझा देश आहे परंतु माझा धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा भारतीय आहे. माझी पत्नी भारतीय आहे. मी एक हिंदू आहे आणि याचा मला सार्थ अभिमान आहे. -ऋषी सुनक