माझा OBC समाजावर वर फार विश्वास नाही, त्यांना लढायचं नसतं – जितेंद्र आव्हाड

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नीट आणि राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचे एक वक्तव्य सध्या चांगलंच गाजत असून त्यावरून आता नवा वाद उभा राहण्याचे चिन्ह आहेत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांनी ‘माझा OBC समाजावर वर फार विश्वास नाही’ असं वक्तव्य केलं आहे. याबाबतचा व्हिडीओ भाजपने आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे.

‘ओबीसींवरती माझा काही फार विश्वास नाही. कारण जेव्हा मंडल आयोग आला तेव्हा मंडल आयोगाचं आरक्षण ओबीसींसाठी होतं, पण जेव्हा लढायची वेळ आली तेव्हा ओबीसी लढायला मैदानात नव्हते, कारण ओबीसींना लढायचं नसतं,’ असं जितेंद्र आव्हाड या व्हिडीओत म्हणता दिसत आहेत.

‘ओबीसींवरती ब्राम्हण्यवादाचा इतका पगडा बसलाय. आपण श्रेष्ठ आहोत. पण त्यांना हे माहिती नाही की चार पिढ्यांपूर्वी आपल्या बापाला, आजोबाला पणजोबाला देवळात सुद्धा येऊ द्यायचे नाहीत. हे सगळे विसरलेत. आता आरक्षणाच्या निमित्ताने का असेना पुढे येतायत. पण नुसतं घरात बसून व्हॉट्सअप करुन चालणार नाही, रस्त्यावर यावं लागेल,’ असं आव्हाड म्हणाले आहेत.

दरम्यान, ‘ओबीसी समाजाचा अपमान करणारे मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस घेणार का?’, असा प्रश्नही भाजपाने उपस्थित केलाय. तसेच ‘राष्ट्रवादीच्या मनात ओबीसी समाजाबद्दल एवढा राग का?, यासाठीच ओबीसींचे राजकीय आरक्षण घालवंल का?,’ असा प्रश्नही भाजपाने विचारलाय. या ट्विटमध्ये आव्हाड आणि राष्ट्रवादीची अधिकृत ट्विटर हॅण्डल टॅग करत त्यांच्यावर निशाणा साधण्यात आलाय.