रोहित शर्माने केले विराट कोहलीचे तोंडभरून कौतुक, म्हणाला….

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी बीसीसीआयने विराट कोहलीला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवून रोहित शर्माकडे कर्णधारपद सोपवले, त्यानंतर क्रिकेट विश्वात चर्चेचा बाजार तापला आहे. विराट कोहलीच्या जागी अचानक रोहित शर्माकडे वनडे कर्णधारपद सोपवल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. २०२१ च्या टी-२० विश्वचषकानंतर विराट कोहलीने टी-२० कर्णधारपद सोडले. यानंतर बीसीसीआयने विराट कोहलीला वनडे कर्णधारपदावरूनही हटवले.

टीम इंडियाचा नवा एकदिवसीय आणि टी-20 कर्णधार बनल्यानंतर रोहित शर्माने विराट कोहलीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. बीसीसीआयने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये रोहित शर्माने म्हटले आहे की, ‘विराट कोहलीने 5 वर्षे टीम इंडियाचे कर्णधारपद भूषवले आहे आणि प्रत्येक सामन्यात त्याला सर्वोत्तम कामगिरी करायची आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने कधीच मागे वळून पाहिले नाही.

रोहित शर्मा म्हणाला, ‘विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणे हा आमच्यासाठी चांगला अनुभव आहे. आम्ही एकत्र खूप क्रिकेट खेळलो आणि प्रत्येक क्षणाचा आनंद लुटला. आता भविष्यातही असेच करणार आहोत. आम्हाला एक संघ म्हणून चांगले व्हायचे आहे आणि आमचे लक्ष त्याकडे आहे.