संभाजीराजे छत्रपतींचं उद्यापासून आमरण उपोषण, ‘वर्षा’ बंगल्यावर मराठा आरक्षण उपसमितीची खलबतं 

 मुंबई – मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर मराठा समाजाने राज्य शासनाकडे केलेल्या मागण्या ह्या १७ जून २०२१ रोजी मुंबई येथे झालेल्या बैठकीत राज्य शासनाने मान्य केल्या होत्या. मात्र आठ महिने उलटले तरी अजूनही त्या मागण्यांवर शासनाने कोणतीच अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती हे २६ फेब्रुवारीपासून मुंबई येथे आझाद मैदानावर आमरण उपोषणास बसणार आहेत.

यावेळी ते एकटे उपोषणास बसणार, असे त्यांनी जाहीर केले असले तरी, संपूर्ण महाराष्ट्रातून सर्व स्तरांतून त्यांना प्रचंड पाठिंबा मिळत आहे. राज्यभरातून मराठा समाजाची २६ फेब्रुवारी रोजी उस्फूर्तपणे आझाद मैदानाकडे येण्याचीही तयारी सुरू झालेली आहे. दरम्यान, संभाजीराजे यांनी आमरण उपोषणाची घोषणा केल्यानंतर राज्य सरकारची धावपळ सुरु झाली आहे.

काल मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. संभाजीराजे यांच्या उपोषणापूर्वी त्यांच्या मागण्यांबाबत तोडगा काढण्यासाठी या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे एमडी, राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभत्कोणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे देखील उपस्थित होते.