समीर वानखेडे हा खोट्या केसेस करुन लोकांना अडकवत आहे – मलिक

मुंबई – आर्यन खान याचा ड्रग्ज प्रकरणाशी किंवा ड्रग्ज माफियांशी संबंध नाही म्हणजे हा फर्जीवाडा होता हे आता हायकोर्टाच्या निकालानंतर स्पष्ट झाले आहे असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

आज हायकोर्टाने आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या निकालानंतर नवाब मलिक यांनी समीर दाऊद वानखेडे याच्या फर्जीवाडयावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मी सुरुवातीपासूनच आर्यन खानचे अपहरण खंडणीसाठी करण्यात आले होते हे सांगत होतो आता हे या आदेशावरून स्पष्ट झाले आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

आता समीर दाऊद वानखेडे सुप्रीम कोर्टात धाव घेईल. रिया चक्रवर्ती प्रकरणातही एनडीपीएस कोर्टाने जामीन दिल्यावर हायकोर्टात धाव घेतली होती. हा सगळा जनतेचा पैसा आहे अशी उधळपट्टी थांबली पाहिजे असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

समीर वानखेडे हा खोट्या केसेस करुन लोकांना अडकवत आहे. खंडणी वसूल करण्याचे धंदे करत आहे. आता वेळ आलीय केंद्रसरकारने भूमिका घेऊन या भ्रष्ट अधिकार्‍याचे तात्काळ निलंबन करावे आणि आताही पाठराखण झाली तर भाजपचा यामागे हात आहे हे स्पष्ट होईल असा टोलाही नवाब मलिक यांनी भाजपला लगावला आहे.