‘फडणवीसांना माझा शब्द आहे…’ ; संजय राऊतांचा जोरदार पलटवार

मुंबई : पाच राज्यांमध्ये निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. यासह देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशमध्ये लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव सुरू झाला आहे. 10 फेब्रुवारीपासून मतदान होणार असून 10 मार्चला निकाल लागणार आहे. पंजाब, उत्तराखंड, गोवा, मणिपूरमध्येही राजकीय तापमान वाढले आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

या निवडणुकीत भाजप, काँगेससह देशभरातील सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. यात महाराष्ट्रात सत्तेवर असणाऱ्या शिवसेनेने गोव्यात देखील निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या गोव्यातील चकरा देखील वाढल्या असून शिवसेने निवडणूक लढवण्याची पूर्ण तयारी केली असून त्यांनी गोव्यात सत्तेत असलेल्या भाजपला शिंगावर घेण्याचे ठरवले आहे.

यावर आता भाजप नेते आणि गोव्याचे भाजप निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस प्रतिक्रिया देत शिवसेनेची खिल्ली उडवली आहे. ‘गोव्यात शिवसेनेचे लढाई ही नोटासोबत असते. त्यांची लढाई ही अनामत एका जागेवर तरी रक्कम वाचवण्यासाठी असते. मला वाटत नाही की ते काही करु शकतील. असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘गोव्यात आमची खरी लढाई नोटांशीच आहे. भाजपचे लोक गोव्यात नोटांचा पाऊस पाडत आहेत. विशेषत: महाराष्ट्रातून बॅगा जात आहेत. त्यामुळे शिवसेनेसारखा पक्ष गोव्यात त्या नोटांशी नक्की लढेल आणि जनतेला दबावाखाली येऊ नका, असे सांगण्याचा प्रयत्न करेल. शिवसेना हा सर्वसामान्यांचा, बहुजनांना, हिंदुत्ववादी पक्ष आहे. शिवसेना भाजपच्या नोटांना पुरून उरेल हे नक्की आहे. फडणवीसांना माझा शब्द आहे तुम्ही कितीही नोटा टाका आम्ही नोटांशी लढू, असे पलटवार संजय राऊत यांनी केला आहे.