INDvsSA | संजू सॅमसन बनणार भारताचा उपकर्णधार? निवडकर्ते सोपवू शकतात मोठी जबाबदारी

१६ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी२० विश्वचषक २०२२पूर्वी (T20 World Cup 2022) भारतीय संघाला मायदेशात दक्षिण आफ्रिकेशी (INDvsSA) दोन हात करायचे आहेत. उभय संघ भारतातील मैदानांवर ३ सामन्यांची टी२० आणि वनडे मालिका खेळणार आहेत. या मालिकांची सुरुवात होण्यापूर्वी मोठी बातमी पुढे येत आहे. यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन (Sanju Samson) याला वनडे मालिकांसाठी भारतीय संघात सहभागी करण्यात येणार असून त्याच्यावर उपकर्णधारपदाचीही (Vice Captaincy) जबाबदारी सोपवली जाऊ शकते.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ६ ऑक्टोबरपासून वनडे मालिका सुरू होत आहे. या मालिकेसाठी अद्याप भारतीय संघाची घोषणा झालेली नाही. अशात या मालिकेसाठी २७ वर्षीय सॅमसनचे उपकर्णधार बनणे जवळपास निश्चित आहे. सॅमसनने ऑगस्ट महिन्यात झिम्बाब्वेविरुद्ध शेवटचा वनडे सामना खेळला होता. त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी संघात सहभागी केलेले नाही. तर शिखर धवन याच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी असू शकते.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी२० मालिका खेळल्यानंतर भारतीय संघ आगामी टी२० विश्वचषकाच्या तयारीसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. त्यामुळे बरेचसे प्रमुख खेळाडू दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेचा भाग नसतील. अशात निवडकर्ते सॅमसन, धवनसारख्या खेळाडूंना प्राधान्य देऊ शकतात.

सॅमसन सध्या न्यूझीलंड अ संघाविरुद्धच्या वनडे मालिकेत भारत अ संघाचे नेतृत्त्व करत आहे. त्याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने ही मालिका जिंकली देखील आहे. भारतीय संघ या मालिकेत २-० अशा विजयी आघाडीवर आहे.