शालेय विद्यार्थी व त्यांच्या पालकांना “शिवसृष्टी” पाहण्यासाठी आता मिळणार विशेष सवलत

६ जून, २०२३ पर्यंत घेता येणार विशेष सवलतीचा लाभ: ६ जून, २०२४ पर्यंत शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचे होणार लोकार्पण

पुणे/विनायक आंधळे : पद्मविभूषण कै. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Shivshahir Babasaheb Purandare) यांच्या संकल्पनेतून आणि महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने न हे आंबेगाव (Ambegaon) येथे साकारत असलेली “शिवसृष्टी” (Shivsrushti) पाहण्यासाठी शालेय विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांना विशेष सवलत देण्यात येणार आहे. यावर्षी आजपासून जून, २०२३ म्हणजेच शिवसाम्राज्य दिनोत्सवापर्यंत ही सवलत देण्यात येणार असल्याची माहिती महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम (Jagdish Kadam) यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. प्रतिष्ठानचे विश्वस्त विनीत कुबेर, शिवसृष्टीचे प्रशासकीय अधिकारी अनिल पवार हे देखील या वेळी उपस्थित होते.

नुकतेच दि. १९ फेब्रुवारी, २०२३ रोजी शिवजयंतीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या उपस्थितीत शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे अर्थात ‘सरकारवाडा’चे (Sarkar Wada) लोकार्पण झाल्यानंतर आता दुसऱ्या चरणाचे काम सुरु झाले असून दि. जून २०२४ पर्यंत दुसऱ्या चरणाचे लोकार्पण देखील संपन्न होईल, असेही कदम यांनी यावेळी सांगितले.

जगदीश कदम पुढे म्हणाले, महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) दैदिप्यमान इतिहास (History) आणि पराक्रम शालेय विद्यार्थ्यांना आपल्या पालकांसोबत अनुभवता यावा, या उद्देशाने शाळांच्या सुट्ट्यांमध्ये शिवसृष्टीची सफर करताना आम्ही त्यांना ही विशेष सवलत देऊ करीत आहोत. जास्तीत जास्त शिवप्रेमींनी शिवसृष्टीला भेट (Visit to Shivsrushti) द्यावी हाच यामागील आमचा प्रामाणिक उद्देश आहे.

सवलतींविषयी अधिक माहिती देताना विनीत कुबेर (Vineet Kuber) म्हणाले, या अंतर्गत येत्या जून २०२३ पर्यंत शिवसृष्टी पहायला येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांकडून रु. १२० ऐवजी रु. ८० तर त्यांच्या पालकांकडून रु. ३५० ऐवजी रु. २५० इतके प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहेत. शिवाय एकावेळी १० जणांच्या समूहाने नोंदणी केल्यास त्यांच्याकडून प्रत्येकी रु. २०० इतके प्रवेश शुल्क आकारण्यात येईल.

शिवसृष्टीमध्ये दुर्ग दर्शन, रणांगण (शस्त्र प्रदर्शन), शिवराज्याभिषेक सोहळा, २० मिनिटांचा आग्र्याहून सुटकेचा इतिहासाला कलाटणी देणारा थरार, १३ मिनिटांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरक भाषण याचा आनंद शिवप्रेमींना घेता येणार आहेच याशिवाय शिवसृष्टीमध्ये आता नाविन्यपूर्ण अशी रायगड सफर ही गतिमान खुर्चीवर बसून शिवप्रेमींना अनुभविता येईल. शिवाय रु. ५० इतके शुल्क देत विद्यार्थ्यांना मावळ्याच्या वेशात घोडेस्वारीचा आनंदही घेता येणार असल्याचे कुबेर यांनी नमूद केले.

दरम्यान, शिवसृष्टी येथील भेटवस्तूंच्या विभागात शिवकालीन तसेच छत्रपतीच्या जीवनाविषयींची पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. याबरोबरच राजमुद्रा (Rajmudra), शिवमुद्रा (Shivmudra), छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा अशा अनेक गोष्टी भेटवस्तू दालनात शिवप्रेमींना खरेदीसाठी उपलब्ध असतील. शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे अर्थात सरकारवाडाचे लोकार्पण झाल्यानंतर मागील दोन महिन्यात शिवप्रेमींचा शिवसृष्टीला चांगला प्रतिसाद मिळाला असून काही हजार शिवभक्त या ठिकाणी भेट देऊन गेले आहेत, अशी माहितीही जगदीश कदम यांनी दिली. जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज व आपला इतिहास पोहोचावा, या उद्देशाने नजीकच्या भविष्यात राज्य सरकार हाती घेत असलेल्या अनेक उपक्रमात आम्ही कायमच त्यांना आवश्यक ती मदत करू असे आश्वासनही कदम यांनी यावेळी दिले.