‘धनंजय मुंडे माझा नवरा आणि मी त्यांची बायको, आता…’, करुणा मुंडेंचे राष्ट्रवादी आमदारावर गंभीर आरोप

संभाजीनगर- शिवशक्ती सेनेच्या संस्थापक अध्यक्ष करुणा शर्मा-मुंडे (Karuna Munde) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यातील प्रकरण सर्वश्रुत आहे. करुणा मुंडे सातत्याने धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत असतात. अशातच आता पुन्हा एकदा करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केला आहे. धनंजय मुंडे माझा नवरा आणि मी त्यांची बायको आहे, असं सांगताना त्यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेक. त्या छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी त्यांनी राज्याच्या राजकारणातील घराणेशाहीवरही टीका केली.

करुणा मुंडे म्हणाल्या, “महाराष्ट्रातील राजकारणात घाणेरडेपणा सुरू आहे. तो घाणेरडेपणा घराणेशाहीचा आणि हुकुमशाहीचा आहे. लोकशाही संपवली जात आहे. त्यामुळे मी करुणा धनंजय मुंडेने पक्ष काढला आहे. तसेच मी घराणेशाही संपवण्याची सुरुवात माझ्यापासून केली आहे. माझा मुंडे खानदानाचा एकच मुलगा आहे. त्याचं नाव सुशील धनंजय मुंडे असं आहे. मी त्याला आज, उद्या, कधीही राजकारणात आणणार नाही. धनंजय मुंडे माझा नवरा आहे आणि मी त्यांची बायको आहे. आता घराणेशाही संपली. कारण धनंजय मुंडेंनी माझा तिरस्कार केला आहे. धनंजय मुंडेंनी २७ वर्षानंतर मला रस्त्यावर सोडलं, तेव्हापासूनच माझी लढाई सुरू झाली आहे.”

“ज्या दिवशी त्यांनी मला सोडलं, तेव्हापासून घराणेशाही संपली. आता मी घराणेशाहीत नाहीमी आता नवऱ्याबरोबर नाही. त्यामुळे ही घराणेशाही होणार नाही मी आज स्वतःच्या मुलाला घरात ठेऊन गोरगरीब जनतेला, गावोगावी, दारोदारी जाऊन भेटत आहे. मी त्यांना एकच विनंती करत आहे की, नव्या लोकांनी पुढे यावं,” असे आवाहन यावेळी करुणा मुंडेंनी लोकांना केले आहे.