संजय राऊत तोंड आवरा, पुन्हा आराम करायची वेळ येऊ नये, देसाईंनी राऊतांना सुनावले खडेबोल

Mumbai: मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न चिघळलेला असून नुकताच कन्नड रक्षण वेदिका संघटनेने महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला केलाय. बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या सहा ट्रकवर दगडफेक करत तोडफोड करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका करताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी “षंढ” हा शब्द वापरला. यावरून शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली.

राऊतांनी एकनाथ शिंदेंसाठी वापरलेल्या षंढ शब्दाचा आम्ही तीव्र निषेध करतो. खुद्द संजय राऊत (Sanjay Raut) यांनाच बेळगाव कोर्टाचं समन्स होतं. तेव्हा न्यायालयाचं कवच असतानाही संजय राऊत तिथे का गेले नाहीत, मग षंढ कोण?, असा प्रतिसवाल देसाई यांनी राऊत यांना विचारला आहे. तसेच पत्रचाळ जमीन घोटाळा प्रकरणी कथित आरोपांखाली राऊत यांना कोठडी झाली असून ते जामीनावर बाहेर आहेत. यावरूनही देसाई यांनी राऊतांना इशारा दिला आहे.

राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना देसाई म्हणाले, ‘षंढ हा शब्द संजय राऊत यांनी वापरला. राऊत स्वतः कोण आहेत? ज्याला 15 दिवसांपूर्वी कर्नाटक सरकारच्या कोर्टाकडून समन्स आलं होतं. ते सुद्धा पूर्ण करण्याचं धाडस संजय राऊतांकडे नाही. न्यायालयाचं कवच असतानाही ते कर्नाटकात जायला घाबरले. ते केवढे मोठे षंढ आहेत.’

‘मोठ्याने बोलायचं, बाह्या सावरून बोलायचं, ही राऊत यांची पद्धत बोलायची कुणीही सहन करणार नाही. संजय राऊत तोंड आवरा. साडे तीन महिन्यांचा आराम करून आलायत. तुमच्या बडबडण्यावरून बाहेरचं वातावरण तुम्हाला सुट होत नाही. पुन्हा आराम करायची वेळ येऊ नये, अशी वक्तव्य टाळावीत’, असा इशारा शंभूराज देसाई यांनी दिला.