‘आम्हीच मूळ शिवसेना आहोत, त्यामुळे शिवसेनेचं चिन्ह हे आमचंच आहे’

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या बंडानंतर आता शिवसेनेत दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटात सध्या बराच संघर्ष सुरू आहे. अनेकांनी विनंती करून देखील उद्धव ठाकरे हे कॉंग्रेस – राष्ट्रवादीची (Congress – Nationalist Congress) साथ सोडायला तयार नसल्याने नेते मंडळी शिवसेनेला राम राम ठोकत आहेत असं चित्र सध्या दिसत आहे.

दरम्यान, या बंडामुळे शिवसेनेची चांगलीच नाचक्की झाली असून आता शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या हातून जाईल अशी शक्यता आहे. विधिमंडळातील एकनाथ शिंदे यांच्या गटाला विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली असून शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान,   उद्धव ठाकरे यांनीही नव्या चिन्हासाठी तयार राहावं असा आदेश शिवसैनिकांना दिला आहे. ‘या प्रकरणातील कायदेशीर लढाई आपण लढू पण, नवं चिन्ह मिळालं तर ते चिन्ह सर्वांपर्यंत पोहचवा असा आदेश ठाकरे यांनी दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या पार्श्वभूमीवर बंडखोर आमदार शंभूराजे देसाई यांनी उद्धव ठाकरेंची भूमिका आणि आगामी राजकीय परिस्थिती यावर टीव्ही ९ शी बोलताना भाष्य केलं आहे.आम्ही आधीपासून हे सांगतोय. ५५ पैकी ४० आमदारांनी शिवसेनेत उठाव केला आहे. हीच खरी शिवसेना आहे. दोन तृतियांशपेक्षा जास्त बहुमताने निवडून आलेले प्रतिनिधी म्हणाले की आपण महाविकास आघाडीत राहाणं चुकीचं आहे. आम्ही उद्धव ठाकरेंना तशी विनंतीही केली होती. पण ते शक्य न झाल्यामुळे आम्ही उठाव केला. दोन तृतियांश लोकप्रतिनिधींनी उठाव केल्यामुळे आम्हीच मूळ शिवसेना आहोत. त्यामुळे शिवसेनेचं चिन्ह हे आमचंच आहे, असं शंभूराजे देसाई म्हणाले आहेत.