“केंद्र सरकारचा कांद्याबाबतचा निर्णय अपेक्षा पूर्ण करणारा…”, शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका

Onion News : केंद्र सरकारने दोन लाख मेट्रिक टन कांदा (onion) खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील. तसेच 2 हजार 410 प्रतिक्विंटल या दराने कांद्याची खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी दिली. यातून मोठा दिलासा आपल्या राज्यातील कांदा उत्पादकांना मिळेल असेही फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमितशाह तसेच केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी यांच्याशी फडणवीस यांनी जपानमधून दूरध्वनीवर संपर्क केला. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती फडणवीसांनी दिली.

केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. पवार म्हणाले की, केंद्र सरकारचा निर्णय अपेक्षा पूर्ण करणारा नाही. केंद्र सरकारने प्रतिक्विंटलसाठी दिलेला २४१० हा भाव कमी आहे. कांद्याला चार हजार रुपये भाव द्यावा, ही मागणी आहे. २ हजार ४०० रुपयांमध्ये शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघणार नाही.

सध्याचा कांदा टिकणारा कांदा आहे. त्यामुळे शेतकरी थांबायला तयार आहेत. म्हणूनच निर्यात शुल्क कमी करण्याची मागणी होत आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत, अशी मागणी पवारांनी यावेळी केली.