देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी म्हणून आम्ही एकत्र येत आहोत – उद्धव ठाकरे

मुंबई: अखेर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीत युती झाली आहे. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली. वंचित आघाडी आणि ठाकरे गट आगामी निवडणुका एकत्रितपणे लढणार आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटासाठी मोठं आव्हान उभं राहणार आहे असं सांगितले जात आहे.

याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आज बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म दिवस आहे. प्रकाश आंबेडकर आणि आम्ही पुढची वाटचाल एकत्र घेऊन जाण्यासाठी एकत्र आलो आहोत. माझे आजोबा आणि प्रकाश आंबेडकर यांचे आजोबा हे स्नेही होते. दोन्ही पिढ्यांचे वारसदार आणि जीवाला जीव देणारे सहकारी एकत्र येऊन ‘देश प्रथम’ याचा विचार करुन पुढे जाणार आहोत.

देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी म्हणून आम्ही एकत्र येत आहोत. पुढील राजकीय वाटचाल कशी असेल याच्याबद्दल आम्ही नंतर वेळेनुसार निर्णय घेऊच, अशी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. जनतेला नको त्या वादात अडकवून भ्रमात ठेऊनच हुकुमशाही येते. त्याच वैचारिक प्रदुषणातून देशाला मोकळा श्वास घेता यावा यासाठी, देशातील लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी आणि घटनेचं पावित्र्य जपण्यासाठी आम्ही दोघे एकत्र येत आहोत असं देखील ते म्हणाले.