‘एखाद्या कामगार संघटनेने मला बोलवले तर लोकशाहीमध्ये चर्चा करण्याचा अधिकार आहे की नाही?’

मुंबई : एखाद्या कामगार संघटनेने मला बोलवले किंवा अन्य कुणाला बोलवले तर लोकशाहीमध्ये त्यांचा चर्चा करण्याचा अधिकार आहे की नाही? या अधिकारातून जर चर्चा केली तर त्यात काहीच गैर नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार शरद पवार साहेबांनी एसटी संघटनांसोबत झालेल्या बैठकीबाबत व्यक्त केले.

मुख्यमंत्री हेच महाराष्ट्राचे निर्णय घेतात. त्यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे त्यांना सर्वांसमोर यायला काही मर्यादा होत्या. तरी परिवहन मंत्र्यांनी जी काही चर्चा झाली ती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवली असणार. राज्याचे महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय हे मुख्यमंत्री एकत्रित विचारानेच करतात, असे प्रतिपादन शरद पवार यांनी केले आहे.

कालच्या बैठकीनंतरही एसटी कामगार विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. या प्रश्नावर बोलताना शरद पवार म्हणाले की, आंदोलन करण्याचा कामगारांचा अधिकार आहे. विलीनीकरण याचा अर्थ काय? तर सर्व कामगारांना शासकीय कर्मचारी मानायचे. हे सूत्र एकाठिकाणी मान्य केल्यानंतर ते एकापुरते मर्यादित राहणार नाही अशी चर्चा आहे. याचा अंतिम निर्णय माझ्या हातात नाही, सरकार याबाबत योग्य तो निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले.