शरद पवारांच्या निशाण्यावर छगन भुजबळ; पहिली सभा होणार भुजबळांच्या बालेकिल्ल्यात

Maharashtra Political Crisis : राज्याच्या राजकारणात अजित पवार (Ajit Pawar) यांनी भूकंप घडवून आणला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर अजित पवार विरुद्ध शरद पवार (Sharad Pawar) यांच्यामधला संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. अजित पवार यांनी बंडखोरी केल्यामुळे पक्षात उभी फूट पडली आहे. नेमका कोणत्या गटाला पाठिंबा द्यायचा? याबाबत कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रम असल्याचं चित्र आहे. दरम्यान,शरद पवार ज्या वैचारिक भूमिकेची मांडणी करत होते ती एवढी कमकुवत आहे का असा सवाल उपस्थित होत असून अजित पवारांचे बंड म्हणजे शरद पवारांचा वैचारिक पराभव असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

दरम्यान, आता उरलेला पक्ष तरी सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात एकत्र राहावा म्हणून शरद पवार हे आता महाराष्ट्र दौरा करणार आहेत. महाराष्ट्रातील नाशिक (Nashik), नागपूर, सोलापूर आदींसह महत्वाच्या जिल्ह्यांचा दौरा शरद पवार करणार आहेत. शरद पवार हे दौऱ्याची सुरुवात नाशिकपासून करणार आहेत.

येवल्यातील जेष्ठ नेते आणि राष्ट्रवादीचे जुने नेते अॅड. माणिकराव शिंदे (Manikrao Shinde) यांनी पुन्हा पक्षात प्रवेश केला आहे. शिवाय रात्री उशिरा त्यांनी शरद पवारांची भेट घेत पक्षात प्रवेश केला आहे. त्याचबरोबर शरद पवार (Sharad Pawar) यांचा महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात नाशिकपासून होत असून येवल्यात 8 जुलै रोजी पहिली सभा होणार असल्याचे समजते आहे.