चंद्रकांत पाटलांच्या मुख्यमंत्री पदाबाबतच्या वक्तव्यावर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, शिरसाट म्हणाले…

संभाजीनगर – वारंवार वादग्रस्त वक्तव्ये करून पक्षाला आणि स्वतःला अडचणीत आणणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे पुन्हा एकदा एक वक्तव्य चर्चेत आले आहे. मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री केलं, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी केलं आहे. या वक्तव्यामुळे भाजप नेत्यांच्या जे पोटात आहे ते ओठात आल्याचे दिसून येत असून चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे मुख्यमंत्रीपदावरून भाजपमधील खदखद समोर आल्याचं बोललं जात आहे.

पनवेलमध्ये आज भाजपच्या (BJP) राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना ते म्हणाले, आम्ही सर्वांनी मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय केंद्रीय नेतृत्वाने घेतला आहे. परंतु, या निर्णयामुळे आपल्याला दुःख झाले. परंतु, एवढं मोठं दुःख पचवून आपण सर्व जण पुढे गेलो ओहोत, अशी खदखद चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवली आहे.

दरम्यान, यावर आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी प्रतिक्रिया दिला आहे. चंद्रकांत पाटील हे त्यांच्या मनातील भावना बोलले असतील. भाजप कार्यकर्त्यांना असं वाटतही असेल.. पण अखेरचा निर्णय देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि एकनाथ शिंदे यांनी घेतलाय. कार्यकर्त्यांना वाटत असेल तर त्यात गैर नाही. पक्ष श्रेष्ठींनी निर्णय गेतल्यानंतर त्यात काहीही अडचण येणार नाही. मतभेदही होणार नाही, असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं आहें.