‘सुटबुट घातलेल्या व्यक्तीला खुर्ची पण लंगोटवाल्या शेतकऱ्यांना बँका साधं विचारतही नाही’

नांदेड – शेतकऱ्यांना एकत्रित करुन त्यांच्या जीवनात बदल व्हावा, यासाठी प्रयत्न व्हायला पाहीजेत, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी केले. येणाऱ्या काळात ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी मिळाल्या पाहिजेत असेही ते म्हणाले.

नांदेडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. नांदेडमध्ये गोदावरी अर्बन मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटीच्या (Godavari Urban Multistate Co-op. Society) ‘सहकारसूर्य’ मुख्यालयाचे उद‌्घाटन यावेळी शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. सहकारी चळवळीचे प्रश्न मांडण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. देशात सहकार चळवळीत महाराष्ट्र आणि गुजरातचा वाटा मोठा असल्याचे ते म्हणाले.

सुटबुट घातलेल्या व्यक्तीला खुर्ची पण लंगोटवाल्या शेतकऱ्यांना बँका साधं विचारतही नसल्याचे पवार यावेळी म्हणाले. यावेळी शरद पवारांनी उसाच्या संदर्भातही वक्तव्य केलं. शेतकऱ्यांनी हार्वेस्टरच्या सहाय्याने उसाची तोडणी करावी, यांत्रिकीकरणचा अवलंब करावा असेही पवार म्हणाले.