शिवसैनिकांना आता एकनिष्ठतेचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार, गळती रोखण्यासाठी शिवसेनेचा जालीम उपाय

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीचे (MVA) सरकार कोसळले असून भारतीय जनता पार्टी (BJP) व शिंदे गटाने एकत्र येत सत्ता स्थापन केली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून गेली आधीच वर्षातील मागील सरकारचा कारभार पाहता या सरकारकडून जनतेला मोठ्या अपेक्षा आहेत.

दरम्यान, या बंडामुळे शिवसेनेची चांगलीच नाचक्की झाली असून आता सेनेकडून सावध पावले उचलली जात आहेत. याचाच एक भाग म्हणून आतापर्यंत शिवबंधन बांधले जात होते पण यानंतर शिवसैनिकांना एकनिष्ठतेचे (Declaration)प्रतिज्ञापत्रच द्यावे लागणार आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांच्यावर विश्वास असल्याचे ते प्रतिज्ञापत्र असणार आहे. बंडखोरांच्या भूमिकेवरुन आता असे बदल पक्षामध्ये केले जात आहेत.

काय असणार आहे प्रतिज्ञा पत्रामध्ये?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर अढळ विश्वास असून त्यांना माझा बिनशर्त पाठिंबा आहे. उद्धव ठाकरे यांच्या प्रति मी पूर्ण निष्ठा व्यक्त करीत आहे. असा मजकूर या पत्रावर असणार आहे. त्यामुळे कोणी पक्ष सोडला तरी त्यापेक्षा वेगळा काही रोल घेऊ नये म्हणून ही काळजी पक्षाकडून घेतली जात आहे. आमदार, माजी नगरसेवक, विभागप्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखाप्रमुखांना अशाप्रकारचे पत्र द्यावे लागणार आहे. भविष्यात कोणी पक्षाबाबत वेगळा असा दावा करु नये शिवाय शिवसैनिकांची वज्रमूठ कायम आहे हे दाखवून देण्यासाठी हा फंडा राबवला जात आहे.