२०२४मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, फडणवीसांचे भाजप आमदारांना आवाहन

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले असून भारतीय जनता पार्टी व शिंदे गटाने एकत्र येत सत्ता स्थापन केली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून गेली आधीच वर्षातील मागील सरकारचा कारभार पाहता या सरकारकडून जनतेला मोठ्या अपेक्षा आहेत.

दरम्यान, राज्यात सन २०२४मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला (Preparations for the Assembly elections to be held in 2024) लागा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी भाजपच्या (BJP) आमदारांना केले. राज्यात आपले सरकार आले असून कोणीही नाराज होऊ नका, सर्वांची कामे मार्गी लागतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केल्याचे समजते.

राज्यात आपले सरकार असले तरी अडीच वर्षांनी येणाऱ्या २०२४च्या विधानसभा निवडणुकीची आतापासून तयारी सुरू करा आणि या निवडणुकीत भाजपला जोरदार यश मिळवून देण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावा, अशी सूचना त्यांनी या बैठकीत दिल्याचे समजते.