शिवसेना खासदार राजन विचारेंचं दिवंगत आनंद दिघेंना भावूक पत्र, ‘साहेब ह्यांना कसं माफ करायचं?’

ठाणे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्यासह शिवसेनेच्या दोन डझनपेक्षा जास्त आमदारांनी बंडखोरी केल्याने पक्षात उभी फूट पडली आहे. परिणामी ठाकरे सरकार (Thackeray Government) जाऊन शिंदे-फडणवीस (Shinde-Fadanvis) यांचे सरकार राज्यात स्थापन झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी उठाव केला असल्याचं म्हटले आहे. कालच, मुख्यमंत्र्यांनी आनंद दिघे (Anand Dighe) यांच्यासोबत काय घडलं? हे वेळ आल्यावर सांगेन असं म्हणत खळबळ उडवून दिली आहे. आता शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे (Rajan Vichare) यांनी दिवंगत आनंद दिघे यांना खुले पत्र लिहित आपल्या मनातील विचार मांडले आहे.

नेमकं काय म्हटलं आहे या पत्रात ?

प्रति,

धर्मवीर आनंद दिघे साहेब जय महाराष्ट्र…
साहेब पत्रास कारण आज तुमची आठवण आली. आज 21 वर्ष उलटून गेली एकही दिवस नाही की तुमची आठवण आली नाही. परंतु आज जास्त आली. 16व्या वर्षापासून तुमच्या सोबत काम करत आलो, या सगळ्या प्रवासात साहेब तुम्ही होता माझा प्रवासात.. अजूनही आहात.. अंधारात वाट दाखवत.. साहेब, आज मी जेवढा अस्वस्थ आहे, तेवढा कधी झालो नाही.. आज जी घटना घडली, मी नाही फक्त शिवसैनिक नाही तर सामान्य मराठी माणसंही खूप अस्वस्थ झाली आहेत. कुठल्या तोंडाने सांगू घात झाला.. दिघे साहेब घात झाला.. तो पण आपल्या माणसाने केला..

शिवसेनेच्या 56 वर्षाची इतिहासात विजयाची नांदी आपल्या ठाण्यातून झाली होती ना साहेब.. तेव्हा तुमच्या 56 इंचाची छाती अभिमानाने भरलेली होती ना साहेब.. ज्या ठाण्यावर तुम्हाला अभिमान होता, त्या ठाण्यावर गद्दारीचा शिक्का बसलाय साहेब… छातीवर नाही पाठीवर वार झाला साहेब… या आधी जेव्हा झाला होता, तेव्हा गद्दरांना क्षमा नाही, तुम्ही बोलले होते ना साहेब.. आणि हा दुसऱ्यांदा झाला… पण तुम्ही नाहीत यांना माफ कसं करायचं आम्ही?
तुम्ही असतात तर केलं असतं म्हणून तुमची आठवण येत आहे साहेब… आनंद आश्रमात तुम्ही शिव बंधन बाधलं होत साहेब.. ते बंधन आज तुटताना दिसतेय… आणि तुम्हाला होणाऱ्या वेदना आम्हालाही होतायत.. पण रडायचं नाही लढायचं हा विचार घेवून पुढे जाणारी संघटना आहे.

आमची शेवटच्या श्वासापर्यंत संघटनेसाठी काम करत असताना पाहिलं.. तुम्हाला काळजी नको साहेब.. कारण कुठल्याही व्यक्तीच्या स्वर्थापेक्षा संघटना महत्वाची असते… ही तुमची शिकवण पुढे घेवून जाणारा हा तुमचा राजन आणि तुमचे सच्चे शिवसैनिक आहेत..
कितीही जणं गेले तरी बाळा साहेब आणि तुमचे विचार आमच्या सोबतच आहे साहेब… आम्ही जीवाची बाजी लावू परंतु शिवसेनेचं ठाणं आणि ठाण्याची शिवसेना ही ज्योत विझू देणार नाहीत… आम्ही परत तुमचा सैनिक वाघासारखा उभा राहणारय.. कारण तुम्ही दिलेली ताकद आजही त्याच्या मनगटात शाबूत आहे. पुन्हा एकदा प्रवास.. साहेब तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या सोबत असू द्या.

– तुमचा सच्चा शिवसैनिक राजन विचारे