‘अजित पवारांसारखं कोणी महायुतीत येत असेल तर आम्ही त्यांचं स्वागतच करू’, शिंदे गटाच्या नेत्याचं विधान

मुंबई –  विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांमुळे चर्चेत येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपात जातील अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. तसेच अजित पवारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Ajit Pawar Meets Amit Shah) यांची भेट घेतल्याचेही म्हटले जात आहे. या सर्व चर्चा सुरू असतानाच शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी अजित पवारांचे महायुतीत स्वागतच करू असे वक्तव्य करत सर्वांचे लक्ष वेधले आहे.

अजित पवार भाजपा किंवा महायुतीत येणार आहेत का? असा प्रश्न विचारल्यानंतर शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, ‘अजित पवार यांच्यासारखं कोणी महायुतीत येत असेल तर आम्ही त्यांचं स्वागतच करू’. (Shambhuraj Desai On Ajit Pawar)

पुढे शंभूराज देसाई म्हणाले की, ‘भाजप आणि आमचं २०० प्लस जागा जिंकण्याचं टार्गेट सेट आहे. त्यामध्ये अजित पवारांसारखं कोणी येत असेल तर त्यांचं स्वागतच आहे. भाजपा, शिवसेना, आरपीआय, इतर मित्रपक्ष आणि अपक्ष अशी आमची महायुती आहे. ही महायुती अधिक भक्कम करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. यात आणखी कोणी येणार असेल तर त्यांचं स्वागतच आहे’.

शिंदे गटातील प्रमुख नेते शंभूराज देसाई म्हणाले की, आम्ही (भाजप आणि शिवसेना) आगामी विधानसभा निवडणूक २०२४ साठीचं लक्ष्य तयार केलं आहे. आम्हाला २०० पेक्षा जास्त जागा जिंकायच्या आहेत. या जागा २०० पेक्षा जास्त, म्हणजेच २२५ किंवा २५० करण्यासाठी कोणी आम्हाला मदत करणार असेल, अधिक जागा निवडून आणण्यासाठी पाठिंबा देणार असेल, तर आम्ही त्यांचं स्वागतच करू. सध्या आम्ही २०० आमदार निवडून आणण्याचं लक्ष्य ठेवलं आहे’ असंही ते पुढे म्हणाले आहेत.