किंगमेकर फडणवीस : गोव्यात शिवसेनेसह सर्वच विरोधकांना फडणवीसांनी दाखवले अस्मान

गोव्यातील कामगिरीमुळे फडणवीसांचे राष्ट्रीय राजकारणातील वजन वाढणार 

पणजी – गोव्यात भाजपा पुन्हा एकदा सत्तेच्या वाटेवर आहे, कारण मतमोजीणी सुरू झाल्यापासून आतापर्यंत समोर आलेल्या निकालांवरून भाजपा सर्वात मोठा पक्ष दिसत आहे. भाजपाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे देखील विजयी झाले असून, भाजपाकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आजच राज्यपालांची भेट घेतली जाणार असल्याचे बोलले जात आहे.

निवडणुकीच्या काळात देवेंद्र फडणवीसांना भाजपनं निवडणूक प्रभारी केलं. पर्रिकर आणि गडकरी यांना जे जमलं नव्हतं, ते फडणवीस करुन दाखवतील का? अशी शंका प्रत्येकालाच होती. मात्र आता सर्व विरोधकांना अस्मान दाखवत फडणविसांनी बाजी मारली आहे.

भाजपच्या या यशामागे देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा आहे. गोवा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांची निवडणूक प्रभारी म्हणून नेमणूक करण्यात आली. त्यानंतर त्यांनी सातत्यानं गोव्यात गाठीभेटी, बैठका यांचा धडाकाच सुरु केला होता. आपल्या कुशल नेतृत्व  गुणांचा वापर करत भाजपसाठी अवघड वाटणारा हा विजय त्यांनी खेचून आणला.

या कामगिरीमुळे बिहारनंतर गोव्यातही यशस्वी कामगिरी करुन दाखवणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचं राष्ट्रीय राजकारणातील वजन नक्कीच वाढणार आहे. दरम्यान, छोट्या पक्षांची किंवा अपक्षांची मदत घेऊन राजकीय समीकरणांची जुळवाजुळव आता फडणवीस आणि सावंतांना जमतं का? याकडे महाराष्ट्रासह संपूर्ण गोव्याचीही नजर लागलेली असणार आहे.