आदित्य ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला बंगळुरुमधून अटक

मुबंई : शिवेसनेचे नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास मुंबई क्राईम ब्रँचच्या सायबर सेलने (Cyber Cell) अटक केली आहे. जयसिंग राजपूत (Jaisingh Rajput) असं त्याचं नाव असून तो अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा (Sushant Singh Rajput) फॅन असल्याचा दावा केला जात आहे. कर्नाटकातील बंगलुरू येथून जयसिंगला ताब्यात घेण्यात आलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने सर्वप्रमथ आठ डिसेंबर रोजी आदित्य ठाकरे यांना व्हॉट्सअ;ॅपवर पहिला मॅसेज पाठवला होता. या मॅसेजवर ठाकरे यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूला आदित्य ठाकरे हेच जबाबदार असल्याचा आरोप आरोपीने आपल्या मॅसेजमध्ये केला होता. मात्र आदित्य ठाकरे यांनी या मॅसेजला रिप्लाय दिला नाही. त्यानंतर आरोपीने त्यांना दूरध्वनीवरून तिनदा कॉल केले. आदित्य यांनी ते कॉल स्वीकारले नाही. कॉल स्वीकारले नसल्याने संतापलेल्या आरोपीने त्यांना थेट जीवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावतीने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  दरम्यान, 34 वर्षीय आरोपी जयसिंग राजपूतला मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून अटक करण्यात आली आहे. सायबर पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास केला. त्यावेळी आरोपी बंगळूरु येथे असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार बंगळूरु येथून राजपूत याला अटक करण्यात आली आहे.