मांसाहाराच्या जाहिराती चालत नाहीत, मग मोदींनी आणलेले ८ मांसाहारी चित्ते कसे चालतात ? 

मुंबई : टेलिव्हिजनवर दाखवण्यात येणाऱ्या मांसाहरी खाद्यपदार्थांच्या जाहिराती (advertisements) बंद कराव्यात, अशा मागणीची याचिका काही जैन (Jain) संघटनांकडून न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती.

या सगळ्यामागे राजकारण असल्याचा आरोप शिवसेनेचे (shivsena) मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून करण्यात आला आहे. दिल्लीश्वरांना मुंबईवरून भगवा हटवायचा आहे. त्यासाठी भाजपकडून (BJP) मुंबईत ‘मराठी कट्टा’, ‘मराठी दांडिया’ यासारखे उपक्रम राबवले जात आहेत. इथे मराठी लोकांमध्ये वितुष्टाचे दांडिये घुमवायचे तर दुसऱ्या बाजूला जैन संघटनांना पुढे करुन शाकाहार, मांसाहार वादास नवी फोडणी द्यायचा प्रकार सुरु असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

‘मांसाहारी खाद्य पदार्थांच्या जाहिरातीमध्ये पक्षी, प्राणीहत्येला प्रोत्साहन देण्यात येते. ग्राहकांना मांस पुरवठा करण्यासाठी मोठया संख्येने प्राणी, पक्षी, सागरी जीवांना निर्दयपणे मारले जाते. मांस, मासे आदींशी संबंधित जाहिराती पाहणे हे जैन समाजाच्या आणि इतर शाकाहारी नागरिकांच्या धार्मिक भावना दुखविणारे व शांतता बिघडविणारे आहे’, असेही जैन याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आठ मांसाहारी चिते नामीबियातून आणले व मध्य प्रदेशच्या जंगलात वाजत गाजत सोडले. ते चित्ते काय जंगलात दही खिचडी, तूप-रोटी खाणार आहेत? मोदींचे सरकार त्यांना चांगला मासाहार पुरवत आहेत. हा काय मांसाहार, हिंसाचार नाही का, असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे.