लिव्ह इन पार्टनरची हत्या, मृतदेह करवतीने कापला आणि तुकडे शिजवून…; मीरा रोडमधील हत्याकांडाने सर्वच हादरले

मुंबई: दिल्लीतील श्रद्धा वलकर हत्याकांड देशभरात चर्चेचा विषय ठरला असून आता मुंबईतही असेच हृदयद्रावक प्रकरण समोर आले आहे. मुंबईतील मीरा रोड परिसरातील गीता आकाशदीप कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या एका महिलेची तिच्याच जोडीदाराने निर्घृण हत्या केली होती. एवढेच नाही तर पुरावा नष्ट करण्यासाठी मारेकऱ्याने महिलेच्या मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये उकळले आणि ते कुत्र्यांना खाऊ घातले. मात्र, त्याच्या एका चुकीमुळे तो पोलिसांच्या हाती लागला.

मीरा रोडच्या गीता नगर येथील गीत आकाश दिप इमारतीच्या ७ व्या मजल्यावरील ७०४ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये मनोज सहानी (५६) आणि सरस्वती वैद्य (३२) हे मागील ३ वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहात होते. बुधवारी रात्री त्यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजार्‍यांनी पोलिसांना पाचारण केले होते. पोलिसांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केल्यावर हे धक्कादायक दृश्य दिसले.

सुरवातीला पोलिसांना तिचे पाय आढळले. धड आणि शीर नव्हते. त्याचा शोध घेतला असता घरातच ते विद्युत करवतीने (इलेक्ट्रीक सॉ) कापून बकेट आणि पातेल्यात ठेवले होते. आरोपी सहानी याने तिची हत्या केल्यानंतर मृतदेहाचे असंख्य तुकडे केले. ते कुकर मध्ये शिवजले आणि गॅसवर भाजले होते. पुरावा नष्ट कऱण्यासाठी त्याने ते घरातील पातेल्यात आणि बादलीत दडवून ठेवले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. ५ दिवसांपूर्वी म्हणजे ४ जूनला सहानी याने ही हत्या केल्याची माहिती नया नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी दिली.

दरम्यान सहानीने कोणत्या कारणाने सरस्वतीची हत्या केली याचा तपास पोलिस करत आहेत अशी माहिती पोलिस उपायुक्त जयंत बजबळे यांनी दिली आहे.