WTC Final: भारतीय गोलंदाजांची दमछाक करत ट्रॅविस हेडने झळकावले शतक, असे करणारा ठरला पहिलाच क्रिकेटर

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या 2021-23 चा अंतिम सामना (WTC Final) इंग्लंडमधील ओव्हल येथे खेळला जात आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ (INDvsAUS) कसोटी चॅम्पियन होण्यासाठी आमनेसामने आहेत. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने तीन गड्यांच्या मोबदल्यात 327 धावा केल्या असून ते विजेतेपदाच्या लढतीत चांगल्या स्थितीत आहेत. ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या दिवसाखेर ट्रॅव्हिस हेडने 146 आणि स्टीव्ह स्मिथने 95 धावा केल्या आहेत. भारताने 76 धावांत ऑस्ट्रेलियाच्या तीन विकेट्स घेतल्या होत्या. मात्र यानंतर फलंदाजीला आलेल्या ट्रॅव्हिस हेडने (Travis Head) वेगवान धावा करत संघाला मजबूत स्थितीत आणले आहे.

या सामन्यात शतक झळकावण्यासोबतच ट्रॅव्हिस हेडने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात शतक झळकावणारा तो पहिला फलंदाज आहे. कसोटी चॅम्पियनशिपच्या पहिल्या अंतिम सामन्यात एकाही फलंदाजाला शतक झळकावता आले नव्हते. सध्या कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील सर्वात मोठी धावसंख्याही हेडच्या नावावर आहे. तो अजूनही नाबाद असून त्याला दुसऱ्या दिवशी द्विशतक झळकावण्याची संधी असेल.

सचिन आणि क्लाइव्ह लॉईड यांच्या क्लबमध्ये सामील
ट्रॅव्हिस हेड आयसीसी स्पर्धेच्या बाद फेरीत पहिले शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे. एकदिवसीय विश्वचषकाच्या बाद फेरीतील पहिले शतक वेस्ट इंडिजचा अनुभवी फलंदाज क्लाइव्ह लॉईडने झळकावले होते. त्याचवेळी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बाद फेरीत भारताच्या सचिन तेंडुलकरच्या बॅटमधून पहिले शतक आले होते. आता ट्रॅव्हिस हेडने कसोटी चॅम्पियनशिपचे पहिले शतक झळकावले आहे.