तुमचे हे धंदे बंद करा; शिवसेनेच्या खासदाराने रोहित पवारांना सुनावले खडेबोल

अहमदनगर – राष्ट्रवादी आणि शिवसेनेत धुसफूस (NCP and Shiv Sena clash) सुरु असून यामुळे महाविकास आघाडीत सर्व काही ठीक नसल्याचे आता समोर येत आहे.  शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) याना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.

गजानन कीर्तिकर यांनी म्हटलं आहे की, राज्यात महाविकास आघाडी करण्यात आमदार रोहित पवार यांचे आजोबा शरद पवार यांचे मोलाचे योगदान आहे. पवार कुटूंबाला मोठी परंपरा असून त्याची जान राजकारण करतांना ठेवण्याची गरज आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर आमदार रोहित पवार यांनी दबाव टाकण्याचे धंदे बंद करावेत, असं खासदार गजानन किर्तिकर यांनी म्हटले आहे.

कीर्तिकर यांनी म्हटलं की, आमदार पवार यांनी आघाडीचा धर्म पाळत मतदारसंघांमध्ये शिवसैनिकांना आणि पदाधिकार्‍यांना विश्वासात घेऊन वाटचाल करावी. जिल्हा नियोजन समितीच्या निधीमध्ये शिवसेनेला वाटा देण्यात यावा. त्याचप्रमाणे मतदारसंघामध्ये होणार्‍या विकास कामांमध्ये शिवसैनिकांना सहभागी करून घ्यावे. शिवसेना पदाधिकार्‍यांनी ज्या तक्रारी केल्यात, यावरून या ठिकाणी परिस्थिती गंभीर होत असल्याचे दिसून येत आहे. त्यांनी आघाडीचा धर्म पाळावा अन्यथा शिवसैनिक ही बांधिल राहणार नाहीत असा इशाराच शिवसेनेचे खासदार गजानन किर्तिकर यांनी दिला आहे.