पटोले यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा श्वेता महालेंनी घेतला समाचार; नानांचा केला ‘पोरकट पटोले’ असा उल्लेख

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले याचं एक बेताल वक्तव्य समोर आले आहे. या व्हिडीओमध्ये ते मारण्याची आणि शिव्या देण्याची भाषा करत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता पटोले यांचा हाच व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये ते कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दिसून येत आहेत. मात्र, त्यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे . हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. कॉंग्रेसच्या बड्या नेत्याने मारण्याची भाषा केल्याने कॉंग्रेसवर मात्र आता टीका होऊ लागली आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता भाजप नेत्यांनी पटोले आणि कॉंग्रेसवर टीकेची झोड उठवली आहे. भाजप आमदार श्वेता महाले यांनी अतिशय तिखट अशी प्रतिक्रिया देत पटोले यांच्यावर शरसंधान केले. त्या म्हणाल्या, नानाभाऊ आपली केवळ शारीरिक उंची वाढली, बौद्धिक उंचीचे काय? राहुल गांधी व आपण बौद्धिक उंचीसाठी प्रयत्न करावेत. पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या जीवाशी खेळ करण्याची सडकी मानसिकता काँग्रेसची होती, नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काँग्रेस पक्षाच्या मनात कमालीचा द्वेष व मत्सर भरलेला आहे. नाना पटोले यांचे आजचे विधान त्याचेच द्योतक आहे. काँग्रेसच्या मनातले ओठावर आले इतकेच! पोरकट पटोले यांचा जाहीर निषेध. असं त्या म्हणाल्या आहेत.