शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याचे पडसाद ;राष्ट्रवादीने केले काळया पट्टया बांधून मूक आंदोलन

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar)  यांच्या सिल्व्हर ओक (Silver oak) बंगल्यावर करण्यात आलेल्या भ्याड हल्लाचा निषेध म्हणून आज राज्यभर आणि गोवा राज्यात काळयापट्टया बांधून राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी व पदाधिकारी, युवक, युवती व महिला यांनी मूक आंदोलन केले. शुक्रवारी शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांच्या एका जमावाने भ्याड हल्ला केला त्यानंतर राज्यभर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र शरद पवार यांनी शांततेचे आवाहन केल्याने राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आली.

दरम्यान काल राज्यातील कानाकोपऱ्यात आदरणीय शरद पवार यांच्या समर्थनार्थ आणि आरोपींना कठोर कारवाई करण्यासंदर्भात व यामागचा मास्टरमाईंड शोधण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकार्‍यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ काळयापट्टया बांधून निषेध नोंदवला. सांगली – इस्लामपूर येथे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील हेही आंदोलनात सहभागी झाले होते. तर मुंबई येथे मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे आणि सौ. राखी जाधव यांच्या नेतृत्वाखाली महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला यांनी आंदोलन केले.

राज्यातील बुलढाणा, परभणी, नागपूर, औरंगाबाद, लातूर, कोल्हापूर, सातारा, नाशिक, अहमदनगर, नंदुरबार, धुळे, अमरावती, अकोला, चंद्रपूर, सांगली, सोलापूर, पुणे, बीड, हिंगोली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, चिपळूण, लांजा, कुडाळ, मालेगाव, उमरगा, सिंदखेडराजा, सटाणा, वसई – विरार, पनवेल, चाकूर, उदगीर, पालघर, फलटण,भिवंडी, आदींसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात हे मूक आंदोलन करण्यात आले. याशिवाय गोवा राज्यात गोव्याचे अध्यक्ष जोसेफ डिसुझा व गोवा निरीक्षक आणि प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनीही आझाद मैदान येथे काळयापट्टया बांधून निषेध नोंदवला.