सोमय्यांचा धडाका सुरूच; डिस्चार्ज मिळताच सर्वात आधी केले ‘हे’ काम

पुणे – पुणे महापालिकेच्या जम्बो कोविड सेंटरच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करावी, या मागणीचे निवेदन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना देण्यासाठी पुणे महापालिकेत शनिवारी भाजपा नेते किरीट सोमय्या आले, मात्र पालिकेच्या पायऱ्यांवरच शिवसैनिकांनी निदर्शने करत त्यांचा रस्ता अडवला.

यावेळी झालेल्या गोंधळात किरीट सोमय्या यांना धक्काबुक्कीही झाली. त्यामुळे ते खाली पडले. सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान राखून तातडीने सोमय्या यांना गाडीत बसविले आणि सोमय्या यांना परतावे लागले. गोंधळात खाली पडल्यामुळे सोमय्या यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

या हल्ल्याबाबत अनेकांनी विवेकवादी भूमिका घेवून या घटनेचा निषेध नोंदवला आहे तर काहींनी नेहमीप्रमाणे सोयीचे मौन बाळगले आहे. दरम्यान, पुण्यातील संचेती हॉस्पिटलमधून उपचारानंतर आता सोमय्या यांना डिस्चार्ज मिळाला आहे. डिस्चार्ज मिळताच सोमय्या यांनी पुणे महापालिकेत जाऊन संजय राऊत कौटुंबिक भागीदार सुजीत पाटकर लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस विरुद्ध कोविड सेंटर्स घोटाळ्यांबाबत तक्रार दाखल केली आहे. माफिया सेना मला ठाकरे सरकारच्या घोटाळ्यांचा पर्दाफाश करण्यापासून रोखू शकत नाही असं म्हणत पुन्हा एकदा शिवसेनेला त्यांनी आव्हान दिले आहे.